हातात सुरा घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला डीबी पथकाने केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरालगत असलेल्या व लालगुडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या प्रेमनगर परिसरात धारदार शस्त्रासह धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्याच्यावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास अनिल आत्राम (२३) रा. दरा साखरा ता. वणी असे या धारदार शस्त्रासह परिसरात दहशत निर्माण करतांना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शोध पथक हे १६ सप्टेंबरला शहर व आसपासच्या परिसरात गस्त घालत असतांना त्यांना प्रेमनगर झोपडपट्टी परिसरात एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन महिला व पुरुषांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शोध पथक तात्काळ त्याठिकाणी पोहचलं असता त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचा एक तरुण हातात शस्त्र घेऊन धुमाकुळ घालतांना दिसला. डीबी पथकाने धारदार शस्त्रासह परिसरात दहशत माजविणाऱ्या आरोपीला अटक करीत त्याच्या जवळील सुरा ताब्यात घेतला. ३९.०५ सेमी लांब व ९ सेमी रुंद असलेल्या या सुऱ्याचा पाता २६.५ सेमी तर मूठ १३ सेमी एवढी आहे. हा धारदार व आकाराने अतिशय मोठा असलेला सूरा गुन्हे शोध पथकाने जप्त करीत आरोपी विकास आत्राम याला मोठा शिताफीने अटक केली. त्याच्यावर भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम ४/२५ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून गुन्हे शोध पथकाचे विकास धडसे, वसिम शेख, शुभम सोनुले, सागर सिडाम यांनी केली.
Comments
Post a Comment