वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी मनसेचा भव्य रोजगार मेळावा, अपेक्षित क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक लोक कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांमधून जनहीत साधता यावं, हा या उपक्रम राबविण्यामागचा उद्देश असल्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेतुन स्पष्ट केले आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी त्यांच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रम प्रस्तावित असून ते लवकरच जनतेसमोर आणून प्रखरतेने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जनतेचं हित लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचा जनतेला मोठा लाभ होणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील जनता सुखासमाधानात नांदावी ही महत्वाकांक्षा बाळगून राजू उंबरकर यांनी लोककल्याणाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडवितांनाच तरुणाईला सतावणारी रोजगाराची चिंताही निर्मुलीत करण्याचे धोरण त्यांनी आखले आहे. शैक्षणिक पात्रता असतांनाही रोजगार मिळत नसल्याने युवा वर्ग नैराश्येच्या गर्तेत आला आहे. शिक्षण पूर्ण करूनही रोजगार मिळत नसल्याने युवक युवतींमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ लागला आहे. युवा वर्गाला भेडसावणारा रोजगाराचा प्रश्न सोडविण्याकरिता आता राजू उंबरकर यांनी पुढाकार घेतला आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींना रोजगार मिळवून देण्याची धुरा राजू उंबरकर यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. बेरोजगारीच्या वाळवंटात होळपळणाऱ्या युवक युवतींना रोजगाराचा मार्ग दाखविणारं संवेदनशील व्यक्तिमत्त्व समोर आलं आहे. मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या सामाजिक उपक्रमांचाच एक भाग म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात भव्य रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. २१ सप्टेंबर पासून नाव नोंदणी व रोजगारासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असून ३ डिसेंबरला भव्य रोजगार मेळावा होणार आहे. शैक्षणिक पात्रता, योग्यता व कुशलतेनुसार युवक व युवतींना या मेळाव्यातून रोजगार उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. नाव नोंदणी व शैक्षणिक प्रमाणपत्रांची पूर्तता करण्याकरिता क्यूआर कोड देण्यात येणार आहे. तसेच शहरातील प्रभागांमध्ये व ग्रामीण भागात पंचायत समिती अंतर्गत कॅम्प लावण्यात येणार आहे. या कॅम्पमध्येही नाव नोंदणी करता येणार आहे. रोजगार भरती मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात ५ हजाराच्याही वर युवक युवतींना रोजगार मिळवून देण्याचा राजू उंबरकर यांचा संकल्प असून तसे त्यांनी आश्वस्तही केले आहे.
महाराष्ट्रातील ६० ते ७० नामांकित कंपन्यांशी राजू उंबरकर यांनी या संदर्भात चर्चा केली असून या कंपन्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास तयार झाल्या आहेत. त्यामुळे युवकांसाठी रोजगार प्राप्त करण्याची ही सुवर्ण संधी असणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार हमखास रोजगार मिळण्याची हमी देण्यात आली आहे. ऐच्छिक क्षेत्रात करिअर घडविण्याचे धेय्य बाळगून स्वप्न पूर्तीकडे वाटचाल करतांना अनेकांना स्वप्न पूर्ण करण्याची संधीच मिळत नाही. अपेक्षित क्षेत्रात करिअर करण्याची आकांक्षा ठेऊन शिक्षण घेणाऱ्या युवक युतींना शैक्षणिक पात्रता असूनही संधी मिळत नसल्याने त्यांच्यात वैफल्याची भावना तयार होऊ लागली आहे. शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या शोधात कंपन्यांचे उंबरठे झिजविणाऱ्या युवा वर्गाला रोजगारासाठी लाचार होतांना पाहून राजू उंबरकर यांचं मन गहिवरलं. त्यामुळे राजू उंबरकर यांनी रोजगारच युवकांच्या दारी आणण्याचा निश्चय करून त्या दिशेने वाटचाल सुरु केली. त्यांनी अनेक नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. कंपन्यांनी त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. इच्छुक युवक व युवतींना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या मेळाव्यात नाव नोंदणी करता येणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांची मुलाखत घेतील व पात्र उमेदवारांना तेथेच नियुक्ती पत्र देतील. याच दरम्यान इच्छुक उमेदवारांची मुलाखातीचीही तयारी करून घेतली जाणार आहे. पाच हजाराच्याही वर युवक युवतींना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार मिळवून देण्याची खात्री देण्यात आली आहे.वणी विधानसभा क्षेत्रात बेरोजगारांच्या फ़ौजा तयार होऊ लागल्या आहेत. बेरोजगारीचा आलेख वाढतच चालला आहे. रोजगाराअभावी युवा वर्ग नैराश्येच्या गर्तेत आला आहे. रोजगारासाठी युवा वर्गाची भटकंती सुरु आहे. हाताला काम नसल्याने जगण्याला आधार राहिलेला नाही. ऐच्छिक क्षेत्रात करिअर घडविण्याचं अनेकांचं स्वप्न अजूनही अधुरच आहे. कुणाचाही वशिला नसल्याने कुशलता असूनही रोजगार मिळत नसल्याची अनेकांची खंत आहे. वशिलेबाजीत रोजगार अडकला आहे. त्यामुळे कुशलतेवर अकुशलता भारी पडतांना दिसत आहे. खनिज संपत्तीने निपुण असलेल्या या तालुक्यात खनिजांवर आधारित अनेक उद्योग उभारण्यात आले आहेत. कोळसाखाणीशी निगडित अनेक कंपन्या या ठिकाणी कार्यरत आहेत. डोलोमाइट व लाइमस्टोनवर आधारित प्रकल्पही आहेत. सिमेंटची निर्मिती करणारा आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्पही याठिकाणी उभारण्यात आला आहे. पण वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांच्या रोजगाराची तहान मात्र भागली नाही. परप्रांतीयांनी त्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारीचे निर्मूलन व्हावे, एवढे प्रकल्प व कंपन्या या ठिकाणी आहेत. पण रोजगाराचे रस्तेच मोकळे करून दिले जात नाही. केवळ मलाईदार रस्त्यांचीच निर्मिती होतांना दिसत आहे. बेरोजगारीची धग जानविलेल्या मनसेने मात्र युवकांच्या भवितव्याशी निगडित या विषयाला हात घातला. बेरोजगारीत खितपत पडलेल्या युवा वर्गाला त्यांचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा खंबीरपणा त्यांनी दाखविल्याने युवा वर्गात आनंदाची लहर पसरली आहे. अनेक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राजू उंबरकर यांनी राबविले आहेत. आता त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारी निर्मूलनाचा विडा उचलला आहे. आणि हेच उद्दिष्ट साध्य करण्याकरिता त्यांनी या भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Comments
Post a Comment