बाजार समितीच्या गाळे लिलावात इच्छुकांचा झाला भ्रम निरास, गाळे लिलावाची प्रतीक्षा लागलेल्यांचा झाला अपेक्षाभंग


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांचा लिलाव करण्याचा मार्ग अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने मोकळा करून दिला आहे. मागील काही वर्षांपासून या दुकान गाळ्यांची लिलाव प्रक्रिया रखडली होती. व्यावसायिक अथवा कार्यालयीन दृष्टिकोनातून गाळे घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना गाळे लिलावाची प्रतीक्षा लागली होती. अखेर पणन महासंघाने गाळे लिलावाला मान्यता दिल्याने गाळे लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. ११ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजतापासून बाजार समितीच्या आवारात गाळ्यांचा जाहीर लिलाव होणार आहे. गाळे लिलावात बोली लावण्याकरिता सर्व अटी शर्तींसह अर्ज भरण्याची ३० सप्टेंबर ही शेवटची तारिख असणार आहे. बाजार समितीच्या कार्यालयात सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत अर्ज विक्री व भरलेला अर्ज स्वीकारला जात आहे. अर्जाची किंमत २ हजार रुपये असून २ लाखांच्या अमानत रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत द्यावा लागत आहे. ५ हजार रुपये एवढा या गाळ्यांचा मासिक किराया ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गाळे लीजवर घेतल्यानंतर या गाळ्यांमध्ये व्यवसाय किंवा कार्यालय थाटने जरुरीचे होणार आहे. पणन महासंघाच्या जाहीरनाम्यात अनुसूचित जाती व जमाती करीता राखीव गाळ्यांची कुठलीही तरतूद करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व जमाती करिता गाळे आरक्षित ठेवण्याला पूर्णतः बगल देण्यात आली आहे. त्यामुळे मागासवर्गीयांना व्यवसायिक प्रवाहात येण्याच्या माध्यमांवर निर्बंध लावण्यात येत असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आता या प्रवाहांमधून उमटू लागल्या आहेत. 

दिव्यांगांना ३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी अमानत रक्कम व मासिक किराया देखील कमी ठेवण्यात आला आहे. मात्र मागास्वर्गीयांसाठीचं गाळे आरक्षित धोरण बदलण्यात आलं आहे. त्यामुळे मागासवर्गीयांचा मोठा हिरमोड झाला आहे. बाजार समितीच्या एकूण ७८ गाळ्यांचा जाहीर लिलाव होणार आहे. २९ वर्षांसाठी हे गाळे लीजवर देण्यात येणार आहे. कार्यालय व गोदाम याकरिता गाळे लिलावाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ५ लाखांपासून पुढे या गाळ्यांच्या लिलावाची बोली राहणार असल्याचे चर्चेतून ऐकायला मिळत आहे. दिव्यांगांसाठी ३ लाखांपासून बोली राहणार असल्याचे ऐकायला मिळत आहे. बाजार समितीने स्वनिधीतून या गाळ्यांचे बांधकाम केले असून ३ कोटी ५९ लाख ३८ हजार २१९ रुपये एवढा निधी या गाळ्यांच्या बांधकामावर खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. गाळे लिलावात बोली लावण्याकरिता अनेक जण निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे. अतिशय कमी प्रमाणात अर्ज विक्री झाल्याचेही ऐकायला मिळत आहे. अर्जाची किंमत २ हजार रुपये तर अमानत रक्कम २ लाख रुपये ठेवण्यात आल्याने इच्छुकांनीही गाळे लिलावाकडे पाठ फिरविल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच ५ हजार रुपये मासिक किराया असल्याने इच्छा असतांनाही अनेक जण गाळे लिलावात भाग घेणे टाळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बाजार समितीच्या गाळे लिलावाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक इच्छुकांचा अटी, शर्ती, मासिक किराया, अर्ज शुल्क, अमानत रक्कम व मागास्वर्गीयांकरिता गाळे आरक्षित नसल्याने भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे हा गाळे लिलाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असल्याच्या खुल्या प्रतिक्रिया शहरातून उमटू लागल्या आहेत. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी