Latest News

Latest News
Loading...

शेत तळ्यात आढळला लाठी (बेसा) येथील युवकाचा मृतदेह, मृतक ईगल कंपनीत होता कामाला




प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील लाठी (बेसा) येथील युवकाचा शेत तळ्यात मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना आज २९ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली. भालर वरून लाठीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजय बलकी यांचे शेत असून ते शेत सध्या त्यांचे नातेवाईक राहुल खिरटकार यांच्याकडे वहतीला आहे. त्यांना शेतातील तळ्यात आज सकाळी एका युवकाचा मृतदेह तरंगतांना दिसला. त्यांनी ही माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मृतक हा लाठी येथील रहिवासी असल्याचे समजले. वेकोलीशी अधिनस्त असलेल्या ईगल इंफ्रा. इंडिया लिमिटेड या कंपनीत कामाला असलेल्या या युवकाचे नाव शंकर जनार्धन खारकर (३५) असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. 

मृतक शंकर खारकर याला दारूचे व्यसन जडले होते. त्याची पत्नीही त्याच्यापासून विभक्त असल्याचे सांगण्यात येते. शंकर हा ईगल इंफ्रा. इंडिया लिमिटेड या वेकोलीशी अधिनस्त असलेल्या कंपनीत कामाला होता. तो सकाळी ४ वाजता घरून निघाल्याचे सांगण्यात येते. व्यसनाच्या अधीन असल्याने त्याच्याशी कुटुंबीयांचा वार्तालापही कमीच व्हायचा. अशातच आज सकाळी लाठी रस्त्यावरीलच शेत तळ्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्याने शेत तळ्यात आत्महत्या केली की, त्याचा तोल गेला हे लवकरच पोलिस तपासातून निष्पन्न होईल. संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने घातपाताच्या शक्यतेच्या दिशेनेही पोलिसांकडून तपास केला जात आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.