विद्युत तार व केबल चोरी करणाऱ्या रॅकेट मधील एक चोरटा लागला एलसीबी पथकाच्या गळाला

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहर व तालुक्यात विद्युत तार व केबल चोरीच्या वाढलेल्या घटनांनी पोलिस प्रशासनाची चिंता वाढविली असतांनाच पोलिसांवर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचा दबावही वाढला होता. विद्युत तार चोरीच्या तक्रारींनी पोलिसांची डोके दुखी वाढविली होती. पोलिस केबल चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करीत होते. पण चोरटे पोलिसांना गवसतच नव्हते. चोरट्यांनी विद्युत तार व केबल चोरीचा सपाटाच लावल्याने चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. सतत घडणाऱ्या केबल चोरीच्या घटनांमुळे तालुक्यात केबल चोरट्यांची टोळीच सक्रिय असल्याचा पोलिसांना अंदाज आला. तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या या केबल चोरट्यांना हुडकून काढण्याकरिता पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखा पथकानेही कंबर कसली. शेवटी केबल चोरीच्या रॅकेट मधील एक चोरटा स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या गळाला लागलाच. केबल चोरट्यांच्या मागावर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आपल्या शोध कार्याची व्यापकता परत एकदा दाखवून दिली आहे. केबल चोरीच्या घटनांनी तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या चोरट्यांच्या टोळीतील एका सदस्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून टोळीतील अन्य साथीदारांची नावे वदवून घेत केबल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सय्यद अब्दुल अली (४४) रा. फुकटवाडी, गुरुनगर वणी, ह. मु. खडकीपुरा नेर असे या ७ लाख ७२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आलेल्या केबल चोरट्याचे नाव आहे. 

तालुक्यात विद्युत तार व केबल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक अलर्ट मोडवर होते. केबल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने तपास व शोध कार्य सुरु असतांनाच स्थानिक गुन्हे शाखा पथकाला एका चार चाकी वाहनामधून अल्युमिनियम तार शहरात आणला जात असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. एलसीबी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे घोन्सा टी-पॉईंट येथे सापळा रचला. दरम्यान घोन्सा मार्गाने एलसीबी पथकाला एक बुलेरो वाहन शहराकडे येतांना दिसले. पोलिसांनी त्या वाहनाला थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये कापलेल्या विद्युत तारांची सहा बंडलं आढळून आली. तसेच वाहनात गॅस कटर व दोन ऑक्सिजन सिलेंडर आढळून आल्याने विद्युत तारा गॅस कटरने कापून आणल्याची एलसीबी पथकाला खात्री पटली. पोलिसांनी वाहन चालक सय्यद अब्दुल अली याच्याकडे विद्युत तारांबाबत चौकशी केली असता त्याने कायर जंगल परिसरातून दोन दिवसांपूर्वीच विद्युत तार गॅस कटरने कापून आणल्याचे सांगितले. विद्युत तार चोरीत त्याच्या बरोबर अनिल यमूलवार व दिनेश मेश्राम हे देखील असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. विद्युत तारांचे बंडल शहरात गोपनीय ठिकाणी साठवून ठेवण्याकरिता नेत असल्याचेही त्यांने पोलिसांना सांगितले. त्याला पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने याआधीही आपल्या साथीदारांसह शहर, तालुका व वणी उपविभागात ठिकठिकाणी विद्युत तारांची चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या विद्युत तारांचे बंडल घरासमोरील एका मालवाहू वाहनात असल्याचेही सय्यद अब्दुल अली या चोरट्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सय्यद अब्दुल अली या चोरट्याने आपल्या साथीदारांसह वणी उपविभाग व जिल्ह्यातील इतरही गाव शहरातून चोरी केलेल्या विद्युत तारांचे १५ बंडल, कापलेल्या लोखंडी विद्युत खांबाचे १३ तुकडे, केबल जाळून गोळा केलेल्या कॉपर तारेने भरून असलेले तीन पोते, एक मोठे गॅस कटर, दोन ऑक्सिजन सिलेंडर असा सर्व मिळून किंमत २ लाख ७२ हजार रुपये व दोन चार चाकी वाहन असा एकूण ७ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

वणी शहरालगत व ग्रामीण भागातील शेतशिवार व जंगल परिसरातील विद्युत तारा गॅस कटरने कापून चोरी केल्याचे चोरट्याने कबुल केले आहे. त्याच्या सोबत विद्युत तारांची चोरी करण्यात इतरही साथीदार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यावरून विद्युत तार व केबल चोरी करणारे एक रॅकेटच सक्रिय असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिस सय्यद अब्दुलअली या चोरट्याकडून टोळीतील अन्य साथीदारांची नावे वदवून घेण्याचा प्रयत्न करीत असून केबल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने तपास करीत आहे. सय्यद अब्दुल अली व त्याच्या साथीदारांनी गणेशपूर वणी, नरसाळा मारेगाव , राळेगाव शहर, घाटंजी रोडवरील कोळंबी येथूनही विद्युत तार चोरी केल्याची कबुली दिली आहे. सय्यद अब्दुल अली व त्याच्या साथीदारांच्या शिरावर चोऱ्यांचे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. राळेगाव पो.स्टे. मध्ये १, शिरपूर पो.स्टे. १, मारेगाव पो.स्टे. १, वणी पो.स्टे. १ व वडगाव जंगल पो.स्टे. येथे २ गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपीने इतरही ठिकाणी विद्युत तारा चोरी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. वेकोलिच्या कोळसाखानीतूनही केबल चोरी गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरट्याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या चोरट्याला विद्युत तार चोरी प्रकरणाच्या चौकशी करिता सध्या शिरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, एलसीबी पथकाचे योगेश डगवार, सुनिल खंडागळे, भोजराज करपते, सुधीर पिदूरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सुधीर पांडे, सतीश फुके, नरेश राऊत यांनी केली.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी