दोघेही विवाहित असतांना त्यांचं एकमेकांवर जडलं प्रेम आणि एकाच दोरीने गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली सेम
प्रशांत चंदनखेडे वणी
दोघांचीही लग्न झालेली, दोघांनाही मुलंबाळं, पण तरीही त्यांच्यात शारीरिक आकर्षण जागलं. आकर्षणातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. देहभान विसरून ते प्रेमात आकंठ बुडाले. त्यांना आपल्या संसारिक जीवनाचंही भान राहिलं नाही. ते मुलाबाळांचे आई वडील असल्याचाही त्यांना विसर पडला. विवाहित असतांना त्यांच्यात प्रेमाचा भाव जागला. आणि त्यांच्या प्रेमाच्या चर्चेने अख्खा गाव जागला. संस्कार घडविण्याच्या वयात प्रेमाचं अंकुर फुटलं, आणि नंतर त्यांचा संयमही सुटला. प्रेमात आंधळे होऊन त्यांनी घरून पलायन केलं. पण परत आल्यानंतर त्यांना कुणी जवळ नाही केलं. अशातच खचलेल्या मानसिकतेतून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. एकाच नायलॉनच्या दोरीने दोघांनीही गळफास घेतला. त्यांच्या एका चुकीच्या निर्णयाने दोन कुटुंब उद्धवस्त झाली. एका कुटुंबातील मुलांचं मायेचं छत्र हरपलं तर दुसऱ्या कुटुंबातील मुलांचं पित्याचं छत्र हरपलं आहे. शेवटी आंधळं प्रेम अंधकारातच लुप्त झालं. आंधळ्या प्रेमात जीवनाचाच शेवट झाला.
झरी जामणी तालुक्यातील कोडपाखिंडी शेत शिवारात या विवाहित प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. मुरूमाच्या उत्खननातुन तयार झालेल्या खड्ड्याजवळील पळसाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना काल २९ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. नामदेव गोविंदराव खडसे (३३) रा. कोडपाखिंडी व मंदा अर्जुन गाऊत्रे (३०) रा. झरी अशी या गळफास घेतलेल्या प्रेमी युगलाचे नावे आहेत. या दोघांमध्ये आकर्षणातून प्रेम संबंध प्रस्थापित झाले. अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरु असल्याने गावातही चर्चा व्हायला लागली. अशातच त्यांनी घरून पलायन केले. त्यानंतर ते गावात परतल्यानंतर त्यांना घरच्यांनी जवळ केले नाही. अशी चर्चा ऐकायला मिळते. त्यामुळे खचलेल्या मानसिकतेतून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. दोघांनीही एकाच नायलॉन दोरीने गळफास घेत जीवनाचा शेवट केला. कोडपाखिंडी गावचे पोलिस पाटील अंकुश नत्थू मेश्राम यांना घटनेची मिळताच त्यांनी पाटण पोलिस स्टेशनला फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविले. नामदेव खडसे याला एक मुलगा व एक मुलगी असून मंदा गाऊत्रे हिला दोन मुली आहेत. ही मुलं आई आणि पित्याच्या मायेला पोरकी झाली आहेत. पुढील तपास पाटण पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment