धम्मदीक्षेने पावन झालेल्या राजूर (कॉ.) येथिल दीक्षाभूमीवर होणार धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा भव्य सोहळा
प्रशांत चंदनखेडे वणी
क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा देण्याकरिता नागपूर व चंद्रपूर नंतर राजूर या चळवळी प्रधान गावाचीही निवड केली होती. राजूर या गावाची त्या काळापासून तर आजही चळवळीचे गाव म्हणूनच ओळख आहे. राजूर या गावाला क्रांतिकारी चळवळीचा वारसा लाभला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे यांच्यासह भदंत आनंद कौसल्यायन यांनी राजूर येथे प्रत्यक्ष येऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या धम्मदीक्षा सोहळ्याची साक्ष म्हणून राजूर येथे दीक्षाभूमी साकारण्यात आली. राजूर येथील दीक्षाभूमी ही मिनी दीक्षाभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. राजूर या गावाने अनेक नामवंत गीतकार, गायक, प्रबोधनकार व शाहीर महाराष्ट्राला दिले. राजूर या गावातील गायकांनी बाबासाहेबांच्या संघर्षाची गाथा गीतांच्या माध्यमातून देशभरात पोहचविली. राजूर येथील गायकांनी गायलेली बाबासाहेबांची गाणी आजही अजरामर आहेत. अशा या बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव जपलेल्या राजूर या गावात ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा थाटात साजरा होत आहे. दीक्षाभूमी येथे ७ ऑक्टोबरला महिला समारोह समिती राजूरच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. अतिशय दिमाखात व भव्य स्वरूपात हा सोहळा होणार असून महिला आयोजन समिती कडून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात खोलवर रुजलेली विषमतेची पाळेमुळे खणून काढली. वर्षानुवर्षे विषमतेच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली. गुलामीच्या जोखडातून त्यांना बाहेर काढलं. माणसांना माणसांचा असलेला विटाळ त्यांनी दूर केला. जातीभेदाच्या भिंती तोडून समाजात समानता प्रस्थापित केली. शेवटी या रूढी बंधनातून मुक्त करून त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेंव्हा पासून जातीने नाही तर बौद्ध म्हणून बाबासाहेबांचा अनुयायी ओळखला जाऊ लागला. तो ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळा सदैव स्मरणात रहावा म्हणून धम्मचक्र प्रवर्तनदिन संपूर्ण भारतातच नाही तर विदेशातही साजरा केला जातो. मिनी दीक्षाभूमी म्हणून नावलौकिक प्राप्त असलेल्या राजूर (कॉ.) येथील दीक्षाभूमीवर ७ ऑक्टोबरला ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा होत आहे.
७ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता भदंत डॉ. राजरत्न यांच्या हस्ते या सोहळ्याचं उदघाटन होणार असून दुपारी १ वाजता भदंत धम्मसारथी यांचा धम्मदेसना हा कार्यक्रम होईल. दुपारी १ ते ४ या वेळात या भव्य आरोग्य शिबीर घेण्यात येणार असून या शिबिरात मोफत औषधांचे देखील वाटप करण्यात येणार आहे. या शिबिराला डॉ. स्नेहदीप मेंढे (जनरल सर्जन, मूळव्याध व त्वचारोग तज्ज्ञ), डॉ. बुद्धवी मेंढे (डेंटल सर्जन), वैद्य. प्रशिक बरडे (BAMS, DPTH, DNYS), डॉ. एम. चिंचोलकर (BEMS, MD) या तज्ञ डॉक्टरांची उपस्थित लाभणार आहे. दुपारी ३ वाजता थायलंड प्राप्त १११ बुद्ध मूर्तींचे वितरण सन्मान सोहळा व परदेशातील शिक्षणाकरिता शिष्यवृत्तीच्या संधी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. धम्मदूत व सिने अभिनेते डॉ. गगन मलिक हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून इंजि. पी.एस. खोब्रागडे व हेमंत सुटे यांचं मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे. सायंकाळच्या सत्रात धम्मभोज व प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. बहुजनांच्या व्ह्रदयात पुरोगामी विचार पेरणाऱ्या, बाबासाहेबांची मानवतावादी शिकवण जनमानसात रुजविणाऱ्या व आपल्या पहाडी आवाजातून शिव, फुले आंबेडकरी विचारांचं प्रबोधन करणाऱ्या सिमा पाटील (मुंबई) यांचा वास्तववादी विचारांचा शाहिरी बाणा उपस्थितांना वास्तववादी विचारांची प्रेरणा देणार आहे. राजूर (कॉ) येथे होणाऱ्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या भव्य सोहळ्याला बहुजनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आव्हान आयोजन समितीने केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महिला समारोह समिती अथक परिश्रम घेत आहे.
Comments
Post a Comment