उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य पदी रविंद्र कांबळे यांची नियुक्ती
प्रशांत चंदनखेडे वणी
उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या वणी सदस्य पदी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची सामाजिक कार्याची तळमळ व समाज कार्यात असलेली अग्रेसरता पाहून यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी त्यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती केली आहे.
शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेल्या तीन सामाजिक कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात येते. त्यात वणी येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. रविंद्र कांबळे यांचं सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. रुग्णवाहिकेच्या माध्यमातूनही त्यांनी रुग्णसेवा केली आहे. सामाजिक कार्यात ते नेहमी तत्पर असतात. समाजावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमी आवाज उठविला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व म्हणून रविंद्र कांबळे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या याच समाज कार्याची जाणीव ठेऊन त्यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या गठीत करण्यात आलेल्या कार्यकारणीत सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी या समितीचे अध्यक्ष असून गटविकास अधिकारी या समितीचे सचिव आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी, अनुसूचित जाती, जमातीचे प.स. सदस्य, तहसीलदार (उपविभागांतर्गत सर्व तालुक्यातील), अनुसूचित जाती, जमातीचे दोन कार्यकर्ते तथा केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेले तीन सामाजिक कार्यकर्ते या समितीचे सदस्य आहेत. रविंद्र कांबळे यांची या महत्वपूर्ण समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment