देव दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात, २५ प्रवासी जखमी
प्रशांत चंदनखेडे वणी
देव दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन २५ प्रवासी जखमी झाल्याची घटना काल २८ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता वणी यवतमाळ मार्गावरील गौराळा फाट्याजवळ घडली. अकोला वरून चंद्रपूर येथे महाकाली दर्शनाला भाविकांना घेऊन जाणारी हमसफर ट्रॅव्हल्स उभ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स मधील २५ प्रवासी जखमी झाले आहे. भरधाव ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने ट्रॅव्हल्सचा समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला. समोर बसलेली एक प्रवासी महिला बसमध्ये अडकल्याने तिला अक्षरशः कटरने पत्रे कापून बाहेर काढावे लागले. ट्रॅव्हल्स ट्रकला धडकल्यानंतर झालेला मोठा आवाज व प्रवाशांच्या किंचाळ्या ऐकून लगतच्या गावातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहचविण्यास सहकार्य केले. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही शीघ्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
अकोला येथून चंद्रपूर येथे महाकाली मातेच्या दर्शनाला जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सला काल रात्री भीषण अपघात झाला. गौराळा फाट्याजवळ उभ्या ट्रकच्या मागून ट्रॅव्हल्स धडकली. मालवाहू टिप्पर हे रस्त्याच्या कडेला उभे होते. चंद्रपूरकडे भरधाव जात असलेली ही हमसफर ट्रॅव्हल्स ट्रकच्या मागून धडकली. ट्रॅव्हल्सच्या हेडलाईटचा प्रकाश दूरवर पडत असतांनाही उभा ट्रक चालकाच्या दृष्टीस पडला नाही, आणि हा भीषण अपघात घडला. ट्रॅव्हल्स मधील प्रवासी हे तेल्हारा, आकोली येथील रहिवाशी असल्याचे कळते. ते अकोला येथील हमसफर ट्रॅव्हल्सने (MH २७ A ९९९४) चंद्रपूर येथे महाकाली मातेच्या दर्शनाला निघाले होते. दरम्यान वणी मारेगाव मार्गावरील गौराळा फाट्याजवळ उभ्या टिप्परला (MH ३४ W ९९०९) ट्रॅव्हल्स धडकली. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहे. काहींना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी प्रवाशांची नावे मात्र अद्याप कळू शकली नाही.जखमींवर खाजगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment