ट्रेलर चालकाचे अपहरण, खंडणीची मागणी आणि सुटका, अपहरण नाट्याचा शिरपूर पोलिसांनी काही तासांतच केला उलगडा

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यातील मोहदा येथिल एका गिट्टी क्रेशर मालकाची पोकलँड मशीन घेऊन आलेल्या परप्रांतीय ट्रेलर चालकाचे पाच जणांनी अपहरण करीत ट्रेलर मालकाकडे खंडणी म्हणून मोठ्या रक्कमेची मागणी केली. ट्रेलर मालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने अपहरणकर्त्यांनी चालकाला मारहाण करीत त्याच्या जवळील १६ हजार रुपये हिसकावून घेत त्याला सोडून दिले. घडलेल्या प्रकाराने ट्रेलर चालक चांगलाच धास्तावला. त्याने सरळ शिरपूर पोलिस स्टेशनला येऊन अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. शिरपूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या काही तासांतच पाचही अपहरणकर्त्यांना अटक केली. ही घटना २४ सप्टेंबरला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास वेळाबाई फाट्यावर घडली. 

अहमदनगर येथून मोहदा येथे पोकलँड मशीनची ट्रेलरने वाहतूक करणाऱ्या महताब शहाबुद्दीन अन्सारी (२४) या परप्रांतीय ट्रेलर चालकाचे मध्यरात्री वेळाबाई फाट्याजवळ ट्रेलर अडवून पाच जणांनी अपहरण केले. ट्रेलर चालक हा पोकलँड मशीन गिट्टी क्रेशर मालकाकडे उतरून परतीच्या मार्गाला लागला होता. दरम्यान वेळाबाई फाट्याजवळ पाच जणांनी ट्रेलर (MH १६ CV ३२०८) अडवून चालकाला जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी चालकाला वाहनात बसवून वाहन वरोऱ्याच्या दिशेने सुसाट नेले. अपहरकर्त्यांनी ट्रेलर मालकाला फोन लावून ड्रायव्हरला किडनॅप केल्याचे सांगत मोठ्या रक्कमेची मागणी केली. ट्रेलर मालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यांनी चालकाजवळील १६ हजार रुपये हिसकावून घेत त्याला शेम्बळ गावाजवळ सोडून दिले. त्यानंतर ते पाचही जण तेथून पसार झाले. अचानक घडलेल्या या घटनेने ट्रेलर चालक चांगलाच हादरला. त्याने सरळ शिरपूर पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना आपबिती सांगितली. पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेत प्रकरण गांभीर्याने घेतले. शीघ्र तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच पाचही आरोपींना अटक केली. 

प्रशांत बबनराव सत्रमवार (४०) रा. भद्रावती, अनिल परशराम भवरे (४९) रा. घाटंजी, दत्तात्रय रघुनाथ कांबळे (४५) रा. घाटंजी, अनिकेत दशरथ भालेराव (२७) रा. घाटंजी, विवेक आनंदराव गेडाम (३८) रा. भद्रावती अशी या पोलिसांनी अटक केलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सपोनि राम कांडुरे करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी