उद्या केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयाचा (केशवस्मृती) होणार थाटात उद्घाटन व लोकार्पण सोहळा

प्रशांत चंदनखेडे वणी 

सहकार क्षेत्रात अतीव प्रगती साधलेला तालुका म्हणून वणी तालुक्याची संपूर्ण विदर्भात ओळख निर्माण झाली आहे. सहकार क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या वणी तालुक्याने सहकार क्षेत्राला संपन्नतेची दिशा दिली आहे. सहकार क्षेत्राच्या प्रगतीचा इतिहास घडविणारा वणी तालुका सहकार क्षेत्रात दिवसेंदिवस अधिक प्रगती करू लागला आहे. यात सहकारी पतसंस्थांचाही मोलाचा वाटा आहे. वणी तालुक्यात पतसंस्थांचं जाळं पसरलं आहे. पतसंस्थांनी ठेवीदारांचं आर्थिक हीत जोपासलं आहे. त्यामुळे ठेवीदार व गुंतवणूकदारांचा कल पतसंस्थांकडे वाढू लागला आहे. सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या पतसंस्थांमध्ये केशव नागरी सहकारी पतसंस्था हे नाव देखील जुळलं आहे. या पतसंस्थेच्या स्थापनेला ३२ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९२ साली रोवलेल्या या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे. केशव नागरी पतसंस्था ही आज प्रगतीच्या शिखरावर आहे. पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरु असून पतसंस्थेच्या ठेवी आज ९२ कोटींच्या घरात आहेत. ३१ मार्च २०२४ पर्यंत पतसंस्थेच्या ठेवी १०० कोटी पर्यंत वाढविण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. या पतसंस्थेची केशवस्मृती ही स्वमालकीची वास्तू तयार झाली असून ही पतसंस्था आपल्या हक्काच्या वास्तूत स्थानांतरित होणार आहे. केशवस्मृती मुख्यालयाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा २७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता थाटात संपन्न होणार आहे. दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँकेच्या मागे केशवस्मृती हे मुख्यालय उभारण्यात आले आहे. या नवीन वास्तूत केशव नागरी सहकारी पतसंस्थेचं मुख्यालय असणार आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनिल देशपांडे यांच्या हस्ते केशवस्मृती या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश महामंत्री विवेक जुगादे हे उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थान पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड हे भूषवणार आहे. तर लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार मदन येरावार, वणी विधानसभा क्षेत्राचे  आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रा,स्व. संघाचे तालुका संघ चालक बंडू भागवत, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नाना चव्हाण, भाजपचे जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची उपस्थिती लाभणार आहे. 

सन १९९२ साली वणी येथे रा.स्व. संघाच्या प्रेरणेतून व सहकार भारतीच्या माध्यमातून केशव नागरी पतसंस्थेची स्थापना झाली. त्यावेळी राजेंद्र खटिक यांच्या पुढाकाराने मुख्य प्रवर्तक विजय बरडे यांनी केशव नागरी पतसंस्थेची बिजारोवणी केली. आज या पतसंस्थेचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे. बँकेच्या ठेवी व गुंतवणूक वाढविण्याकरिता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम या पतसंस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं. छोट्यातल्या छोट्या व्यवसायिकाला सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं. छोट्या व्यावसायिकांना सहज कर्ज उपलब्ध करून देत व्यवसाय वाढविण्याकरिता पतसंस्थेनं मोठा हातभार लावला. टीम वर्क ही या पतसंस्थेची ताकद राहिली आहे. संचालक मंडळाची दुदर्शी प्रणाली व महत्वपूर्ण योगदानाचा या पतसंस्थेच्या प्रगतीत सिंहाचा वाटा राहिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही आपल्या कौशल्याच्या जोरावर पतसंस्थेच्या प्रगतीला आणखीच गती दिली. १० बाय १० च्या छोट्याशा गाळ्यात या पतसंस्थेची सुरुवात झाली. त्यावेळी पतसंस्थेचे भाग भांडवल मात्र ३५ हजार रुपये होते. तर पतसंस्थेच्या ठेवी केवळ ४ लाख रुपयांच्या होत्या. आज या पतसंस्थेचे भाग भांडवल ३ कोटी ६१ लाख ४२ हजार ७२३ रुपये एवढे असून स्वनिधी ४ कोटी ९८ लाख ६६ हजार ३९५ एवढा आहे. संस्थेकडे ९२ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ३१ मार्च २०२३ पर्यंतची पतसंस्थेची गुंतवणूक ५१ कोटी ४ लाख ४५ हजार ८११ कोटी एवढी आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून ३३.५० कोटी एवढे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर असलेल्या पतसंस्थांमध्ये केशव नागरी सहकारी पतसंस्था हे देखील एक नाव जुळलं आहे. या पतसंस्थेची केशवस्मृती ही स्वमालकीची वास्तू तयार झाली असून या इमारतीमध्ये आता पतसंस्थेचे मुख्यालय असणार आहे. केशव नागरी पतसंस्थेच्या सध्या आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, यवतमाळ, उमरखेड येथे शाखा असून आणखी नवीन शाखा निर्माण करण्याचा पतसंस्थेचा मानस आहे.

केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव अनिल अक्केवार, संचालक प्रा. डॉ. गजानन अघळते, सतीश कुलदिवार, अनिल रईच, अरुण कावडकर, किसनलाल खुंगर, प्रदीप राशतवार, विलास लाखे, सुधीर डांगरे, कविता इंगोले, कल्पना गुंडावार, मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार, सह संचालक गणपत अतकरे, विनय कोंडावार हे केशवस्मृती मुख्यालयाच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडत आहेत.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी