वणी विधानसभा क्षेत्राचा विकास हेच धोरण जोपासलेल्या आमदारांचा वाढदिवसही सामाजिक उपक्रम राबवूनच केला साजरा
प्रशांत चंदनखेडे वणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. त्याच अनुषंगाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वणी विधानसभा क्षेत्रात भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरं आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. स्थानिक बाजोरिया हॉल येथे भाजयुमोच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता रक्तपेढीत रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध रहावा, हा दृष्टिकोन जोपासून आमदारांच्या वाढदिवसानिमित्त २५ सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आलं.
वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकाळात झालं, व होतही आहे. विकासात्मक धोरण जोपासून वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणारा त्यांचा कार्यकाळ राहिला आहे. विकसनशील व जनहितकारी कामे हाती घेऊन त्यांनी ती पूर्णत्वास आणली. शहराबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासालाही त्यांनी तेवढीच प्राथमिकता दिली. आता औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर भर देऊन रोजगाराच्या वाटा उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शारीरिक व्याधी व गंभीर आजारांचं निदान लागावं म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात आली. यात भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. भाजपचे जिल्हा प्रमुख तारेंद्र बोर्डे, रवी बेलुरकर, सत्यजित ठाकूरवार, नितीन वासेकर यांनी सर्व सामाजिक उपक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडली.
बाजोरिया लॉन येथे आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास २०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. प्रमुख सचिन पत्की, संचालक गिरीश देशपांडे, डॉ. नितीन दवंडे, डॉ. शीतल सहारे व त्यांच्या चमूंनी रक्त संकलनात मोलाचं सहकार्य केलं. यावेळी रक्तदात्यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. रक्तदात्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व एक मोठी बॅग भेट स्वरूपात देण्यात आली. रक्तदात्यांना देण्यात आलेल्या बॅगवर ५५ हा दोन पंचवार्षिक विजयाच्या यशस्वी वाटचालीचा कार्यकाळ अंक स्वरूपात ठळकपणे दिसत होता. या शिबिरादरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार बोदकुरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता भाजपच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment