नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या महिलांनी गरजू व गरीब महिलांनाही दान करावी एक साडी, स्माईल फाउंडेशनचा स्त्रियांसाठीचा अनोखा उपक्रम
प्रशांत चंदनखेडे वणी
स्माईल फाउंडेशन ही समाजसेवी संघटना नेहमी समाजभिमुख कार्यांना प्राधान्य देत आली आहे. अनेक सामाजिक उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे कार्य करणारी संघटना म्हणून स्माईल फाउंडेशनला ओळखलं जातं. गरीब, गरजूंना विविध माध्यमातून सहकार्य करणाऱ्या या संघटनेने अनेकांना मदतीचा हात दिला आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासातील अडथळे दूर करण्याचा स्माईल फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम राहिला आहे. बौद्धिक कल्पकतेतून अनोखे व आदर्शवत उपक्रम राबविणाऱ्या स्माईल फाउंडेशनने आणखी एक आगळी वेगळी संकल्पना समाजापुढे मांडली आहे. सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याने महिलांकडून स्त्री शक्तीचा जागर केला जात आहे. या काळात पुण्यकर्म करण्याचा स्त्रिया प्रयत्न करतात. तेंव्हा देवी म्हणून स्त्रीची उपासना करतांना स्त्रियांना मदतीचा हात देणं तेवढंच पुण्यदायी कर्म आहे. महिला नवरात्री उत्सवात साड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. नव दिवस नवीन साडी घालण्याला महत्व देऊन त्या आपली धार्मिक भावना जपतात. पण अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना हे भाग्य लाभत नाही. पोटाची खळगी भरण्याच्या संघर्षात साडी घेणं शक्य होत नाही. अशा गरीब व गरजू महिलांविषयी दातृत्वाची भावना ठेवल्यास त्यांच्यावर सण उत्सव फाटलेली साडी नेसून साजरे करण्याची वेळ येणार नाही. समृद्ध कुटुंबातील महिलांनी एक नवीन किंवा वापरलेली साडी स्माईल फाउंडेशनला दान केल्यास स्माईल फाउंडेशन कडून तुम्ही दान केलेली साडी गरजू व गरीब महिलांना देण्यात येईल. त्यामुळे नवरात्रीच्या या उत्सवात त्यांनाही साडी मिळाल्याचा आनंद व समाधान मिळेल.
हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगतांना कपडे घेण्याकरिता पैसाच शिल्लक रहात नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह व दैनंदिन गरजा भागविण्याचा संघर्ष करतांना महिलांना सण उत्सवातही नीट नेटकी साडी नेसायला मिळत नाही. इतर महिलांप्रमाणे नवी कोरी साडी तर सोडाच सुस्थितीत असलेली साडी देखील नवरात्र उत्सवात परिधान करण्याचं अनेक महिलांना भाग्य लाभत नाही. स्त्रीला देवी म्हणून पुजतांना गरजू व गरीब स्त्रियांविषयी आपुलकीचा भाव जागणं गरजेचं आहे. तळागाळातील स्त्रियांच्याही अंगावर नीट नेटकी साडी दिसावी, हे व्रत स्त्रियांनी जोपासल्यास प्रत्येक स्त्रिला सण उत्सव आनंदात साजरा करता येईल. आणि हीच खरी देवीची आराधना ठरेल. गरजू व गरीब महिलांना दातृत्व भावनेतून साडी दान करण्याची इच्छा झाल्यास त्यांनी वॉटर सप्लाय जवळ असलेल्या स्माईल फाउंडेशनच्या कार्यालयात यावे, अथवा संपर्क साधावा. दुर्गा उत्सव मंडळांनी आरतीच्या वेळेला साडी दान करण्याची घोषणा केल्यास स्माईल फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः येऊन साड्या गोळा करेल. तसेच साड्या दान करतांना मंडळा सोबत फोटो काढून मंडळाचे नाव प्रसिद्ध करण्यात येईल. साडी दान करण्याऱ्या सर्वांचीच नावे स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे नवरात्रीच्या या उत्सवात पुण्यकर्म करण्याची इच्छा बाळगणाऱ्या महिलांनी गरजू व गरीब स्त्रियांसाठी एक जुनी किंवा वापरती साडी देऊन त्यांनाही सण उत्सवात नीट नेटकी साडी नेसण्याचं समाधान मिळवून देण्याचं आव्हान स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी केले आहे.
No comments: