Latest News

Latest News
Loading...

विहिरीत उडी घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट वरून पतसंस्थेच्या अध्यक्ष, सचिव व सीईओ वर गुन्हा दाखल

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

केशव नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचाऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल १९ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण रामचंद्र सिदूरकर (४२) असे या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. लक्ष्मण सिदूरकर हे केशव नागरी पतसंस्था वणी येथे लिपिक पदावर कार्यरत होते. नंतर त्यांना सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देऊन त्यांची पांढरकवडा शाखेत बदली करण्यात आली. परंतु अल्पावधीतच त्यांची पदोन्नती रद्द करून परत त्यांची लिपिक पदावरच आर्णी येथे बदली करण्यात आली. आधी प्रमोशन देऊन व नंतर डिमोशन करून बदली करण्यात आल्याने ते मानसिक दडपणात आले. पतसंस्थेच्या अन्यायकारक धोरणामुळे तणावात येऊन लक्ष्मण सिदूरकर यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी मृत्यू पूर्व लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून त्यात पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावांचा उल्लेख आहे. मृतक कर्मचाऱ्याने लिहून ठेवलेली सुसाईड नोट व त्यांच्या पत्नीच्या तक्रारी वरून पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्ष, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   

लक्ष्मण सिदूरकर यांचं मूळ गांव करणवाडी असून ते मागील काही दिवसांपासून परिवारासह मारेगाव येथे वास्तव्यास होते. केशव नागरी पतसंस्था वणी येथे लिपिक पदावर कार्यरत असतांना त्यांना व्यवस्थापक म्हणून पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती देऊन त्यांची पांढरकवडा शाखेत बदली करण्यात आली. परंतु अल्पावधीतच त्यांची पदोन्नती रद्द करून लिपिक पदावरच त्यांची आर्णी येथे बदली करण्यात आल्याने त्यांच्या मनात अन्यायकारक भावना निर्माण झाली. पतसंस्थेच्या अन्यायकारक धोरणामुळे ते चांगलेच तणावात आले. त्यांनी आर्णी येथे बदलीवर जाण्यास नाराजी दर्शविली. आधी प्रमोशन व नंतर डिमोशन करण्यात आल्याने ते डिप्रेशन मध्ये आले. बदली थांबविण्याकरिता त्यांना ७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर आणखीच मानसिक तणाव निर्माण झाला. शेवटी नैराशेतूनच त्यांनी मृत्यूला कवटाळले. १९ ऑक्टोबरला ते आपल्या परिवारासह करणवाडी या आपल्या मूळगावी परतले. पत्नी शेतातील कामे करण्याकरिता गेल्यानंतर त्यांनी घरासमोरीलाच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विहिरीसमोर चपला व कपडे आढळून आल्याने गावकऱ्यांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली. दरम्यान लक्ष्मण सिदूरकर यांची पत्नी शेतातून परत आल्यानंतर त्यांना विहीरी समोर ठेवलेले शर्ट आपल्या पतीचेच असल्याचे लक्षात आले. आणी त्यांनी एकच हंबरडा फोडला. गावकऱ्यांनी विहिरीत गळ टाकून शहानिशा केली असता त्यांना लक्ष्मण सिदूरकर यांनी विहिरीत आत्महत्या केल्याची खात्री पटली. 

गावकऱ्यांनी लगेच ही माहिती मारेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून  मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. लक्ष्मण सिदूरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यात केशव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड, सचिव अनिल अक्केवार व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे लक्ष्मण सिदूरकर यांच्या पत्नीच्या तक्रारी वरून पोलिसांनी या तिघांवरही कर्मचाऱ्याला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भादंवि च्या कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.  


No comments:

Powered by Blogger.