बसस्थानक येथे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या महिलेच्या पती व भावजयवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी बसस्थानक येथे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या अनोळखी महिलेची नंतर ओळख पटली. मृतक महिला ही हिवरा मजरा ता. मारेगाव येथील रहिवासी असल्याचे समोर आले होते. रिता निलेश आसुटकर (४४) असे या विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या महिलेचे होते. ती काही दिवसांपासून पठारपूर ता. झरी येथे आपल्या माहेरी रहात होती. तिच्या पतीनेच तिला घर सोडण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. पतीने तिला घर सोडून जाण्यास भाग पाडल्यानंतर ती आपल्या वडिलांकडे राहू लागली. पतीचे नात्यातीलच महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याने त्यांच्या संबंधात पत्नी अडथळा बनू नये म्हणून पतीने तिला घर सोडून जाण्यास भाग पाडले. विवाहबाह्य संबंधामुळे पती तिला नांदवायला तयार नसल्याने शेवटी नैराश्येतून तिने मृत्यूला कवटाळले. महिलेचा पतीच तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मृतक महिलेच्या वडिलांच्या तक्रारी वरून पोलिसांनी मृतक महिलेचा पती व तिची भावजय या दोघांवरही महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
रिता निलेश आसुटकर या महिलेने गुरुवार दि. १९ ऑक्टोबरला सायंकाळी वणी बसस्थानक येथे विष प्राशन केले. विषाचा घोट घेतल्यानंतर महिलेच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने बसस्थानकावरील प्रवाशांनी तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शीघ्र घटनास्थळी पोहचून महिलेला ग्रामीण रुग्णालयात हलविले. परंतु काही वेळातच तिची प्राणज्योत मालवली. महिला ही अनोळखी असल्याने पोलिसांनी आधी तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. महिलेची ओळख पटल्यानंतर तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला. पोलिस तपासात महिलेचा पती निलेश रामचंद्र आसुटकर (४८) रा. हिवरा मजरा व तिची भावजय प्रिया सुशांत नांदेकर (३०) रा. पठारपूर हे दोघेही महिलेच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांवरही रिता आसुटकर हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भादंवि च्या कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुदाम आसोले करीत आहे.
अनिल व रिता हे पती पत्नी आपल्या वैवाहिक जीवनात रममाण असतांना नात्यातीलच महिलेने त्यांच्या सुखी संसारिक जीवनात विष कालवले. निलेश नात्यातीलच महिलेच्या मोहात अडकला. तिच्याशी त्याचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले. त्यांना नात्याचंही भान राहिलं नाही. आपल्या पत्नीच्या भावाच्या बायकोसोबतच त्याचे सूत जुळले. पत्नी व मुलंबाळं असतांनाही तो नात्यातील महिलेवर भाळला. त्याची नात्यातील महिलेवर नियत फिरली व त्या दोघांत विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. मृतक महिलेच्या भावाला दारूचे व्यसन होते. त्याची दारू सुटावी म्हणून त्याला व्यसन मुक्ती केंद्रात भरती करण्यात आले. त्याला भेटण्याकरिता निलेश व प्रिया सोबत जायचे. अशातच त्यांचे एकमेकांशी सूत जुळले. ते एकमेकांच्या मोहात अडकले. कालांतराने त्यांच्यात विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. अशी चर्चा ऐकायला मिळते. त्यांच्या संबंधाची निलेशच्या पत्नीला कुणकुण लागली. त्यामुळे पती पत्नीत खटके उडू लागले. रिता हिने त्या दोघांना रंगेहातही पकडल्याचे ऐकायला मिळते. नात्याचं भान हरपून त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यांच्या अनैतिक संबंधात पत्नीची अडसर नको म्हणून निलेशने पत्नीला घर सोडायला भाग पाडले. परस्त्रीच्या नादी लागून पतीने संसारिक जीवनाचा घात केल्याने पत्नी कमालीची व्यथित झाली. पतीच्या बाहेरख्याली वृत्तीमुळे विवंचनेत आलेल्या रिताने शेवटी टोकाचा निर्णय घेतला. विषाचा घोट घेऊन ती त्याच्या जीवनातून कायमची निघून गेली. पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे शेवटी पत्नीला जगाचा निरोप घ्यावा लागला. बाहेरख्याली वृत्तीमुळे एका सुखी संसारिक जीवनाचा अंत झाला. रिता आसुटकर हिने मृत्यूला कवटाळले. आणि तिच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या पती व भावजयच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
No comments: