सावर्ला गावाजवळ आढळून आला अज्ञात इसमाचा मृतदेह, इसम अपघातात ठार झाल्याचा संशय, मृतदेहाची अद्याप पटली नाही ओळख
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी वरोरा राज्य महामार्गावरील सावर्ला गावाजवळ एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अपघातात इसमाचा चेहराही छिन्न विछिन्न झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघातात इसमाचा चेहरा अगदीच विद्रुप झाल्याने त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतक इसमाजवळ कुठलेही ओळखपत्र आढळून न आल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांना कठीण झाले आहे. मृतावस्थेत आढळून आलेल्या वर्णनाचा इसम बेपत्ता असल्याची कुठलीही तक्रार पोलिस स्टेशनला प्राप्त नसल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात इसम ठार झाल्याची घटना २१ ऑक्टोबरला रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष असून उंची ५ फूट ७ इंच आहे. मृतक हा अर्ध नग्न अवस्थेत आढळून आला. मृतक इसमाने फिकट काळ्या रंगाचा पॅन्ट घातला असून त्याच्या उजव्या हातावर राखीचा धागा बांधलेला आहे. मृतक इसमाच्या अंगावर शर्ट व अंतर्वस्त्रंही नव्हते. मृतकाजवळ कुठलेही ओळखपत्र अथवा मोबाईल आढळून न आल्याने मृतदेहाची ओळख पटावितांना पोलिसांना मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. सदर वर्णनाचा इसम घरून बेपत्ता असल्यास संबंधितांनी तात्काळ वणी पोलिस स्टेशनमध्ये येऊन शहानिशा करून घावी, असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे. सदर इसम हा अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याचा पोलिसांकडून अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर २७९, ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार गजानन होडगीर करीत आहे.
No comments: