समाजात मानवी मूल्य रुजविणारी बळीराजा ही व्याख्यानमाला आज वणी शहरात, प्रख्यात विचारवंत ज्ञानेश महाराव यांचं होणार व्याख्यान
प्रशांत चंदनखेडे वणी
शिव महोत्सव समितीच्या वतीने २७ व २८ ऑक्टोबरला स्थानिक बाजोरिया लॉन येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कला, साहित्य व प्रगल्भ विचारातून सामाजिक प्रबोधन घडविणारे प्रखर व्याख्याते ज्ञानेश महाराव यांचं बौद्धिक ज्ञान वृद्धिंगत करणारं व्याख्यान उपस्थितांना ऐकायला मिळणार आहे. बुद्धिजीवी लोकांची बौद्धिक ज्ञानाची भूक भागविणारी ही व्याख्यानमाला असणार आहे. वैचारिक प्रबोधन ही आज काळाची गरज झाली आहे. समाजात सकारात्मक व उत्तम विचारांची पेरणी करून समाजाला योग्य दिशा दाखविणं गरजेचं झालं आहे. वैचारिक पातळी वाढविण्याकरिता लोकांमध्ये वैचारिक दृष्टिकोन निर्माण करणं अगत्याचं झालं आहे. ज्ञानवर्धक विचारांचं आकलन होण्याकरिता बुद्धीला प्रभावी विचारांचा स्पर्श होणं गरजेचं असून बुद्धिवादी विचारसरणी लोकांमध्ये रुजविण्याकरिता व्याख्यानं घेण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. व्याख्यानातून विचारांचं प्रबोधन व्हावं याकरिता आणि वणी परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण समृद्ध होऊन संस्कृतीकीकरणाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून शहरात बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिव महोत्सव समितीच्या माध्यमातून मागील आठ वर्षांपासून बळीराजा व्याख्यानमाला घेतली जात आहे. या व्याख्यानमालेचे हे नववे वर्ष असून यावर्षी प्रख्यात व्याख्याते ज्ञानेश महाराव यांचं वैचारिक पातळीत भर पाडणारं व्याख्यान उपस्थितांना ऐकायला मिळणार आहे. २७ ऑक्टोबरला सायं. ६.३० वाजता फक्त राष्ट्रभक्तांसाठी या विषयावर तर २८ ऑक्टोबरला सायं. ६.३० वाजता शाहिरांची लोकशाही या विषयावर ज्ञानेश महाराव यांचं व्याख्यान होणार आहे. विचारवंतांच्या प्रखर विचारातून ज्ञानसंपन्न समाज घडावा, याकरिता बळीराजा ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जात आहे. समाजात मानवी दृष्टिकोन निर्माण व्हवा, याकरिता वैचारिक प्रबोधन होणं गरजेचं झालं आहे. व्याख्यानातून वैचारिक जागरण व्हावं याकरिता बळीराजा ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून मानवी मूल्यांचं जतन करण्याकरिता मानवतावादी विचार पेरण्याचं कार्य या व्याख्यानमालेतून निरंतर केलं जात आहे.
२७ ऑक्टोबरला फक्त राष्ट्रभक्तांसाठी या विषयावर ज्ञानेश महाराव (मुंबई) यांचं व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजानी हे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार निखिल धुळधर, पोलिस निरीक्षक अजित जाधव, मराठा सेवा संघ वणीचे अध्यक्ष अंबादास वागदरकर, शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे सहसचिव अशोक सोनटक्के, एलआयसीचे वणी शाखा प्रबंधक अजय गेडाम, मीनल देवडे (नागपूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणीचे उपाध्यक्ष संजय तेलंग, पोलिस पाटील संगीता बोन्डे (शिरपूर) यांची उपस्थिती लाभणार आहे. २८ ऑक्टोबरला शाहिरांची लोकशाही या विषयावर ज्ञानेश महाराव हे मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजानी राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, एपीआय सीता वाघमारे (वाहतूक उप शाखा वणी), संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रतिक कावडे, जनरल सर्जन डॉ. आशुतोष जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. वाचनालय मारेगावचे अध्यक्ष बाबाराव ढवस, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा आवारी आदी उपस्थित राहणार आहेत. बळीराजा व्याख्यानमाला ही जनतेसाठी बौद्धिक मेजवानी असून बौद्धिक ज्ञानकोशात भर घालणाऱ्या या व्याख्यानमालेला वणी परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.
No comments: