मित्राच्या पार्श्व भागावर चाकूने वार करून पसार झालेल्या आरोपीला डीबी पथकाने अवघ्या काही तासांतच केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
दारू पिण्याकरिता मित्राने पैसे न दिल्याने त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर चाकूने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी करून पसार झालेल्या आरोपीचा डीबी पथकाने अवघ्या काही तासांतच शोध लावून त्याला बेड्या ठोकल्या आहे. मित्रावर प्राणघातक हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी भादंवि च्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. साहिल कैलास पुरी (१९) रा. रंगनाथ नगर असे या आरोपीचे नाव आहे. अगदी कमी वयात तो अट्टल गुन्हेगार बनला असून त्याच्यावर अनेक गंभीर नोंद आहेत.
वाजंत्री असलेले युवक दीपक चौपाटी परिसरात वाद्य वाजविण्याचे पैसे मिळाले किंवा नाही याबद्दल आपसात चर्चा करीत असतांना आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने संदीप कैलास गेडाम याला दारू पिण्याकरिता पैशाची मागणी केली. त्यावर संदीप गेडाम व त्याच्या मित्रांनी त्याला खर्रा दिला, व घरी जाण्यास सांगितले. मित्राने दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला तो अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने संदीप गेडाम याच्यावर हल्ला चढविला. धारदार चाकू संदीप गेडाम याच्या पोटात भोसकण्याचा प्रयत्न केला. पण संदीप गेडाम याने धाडसाने चाकूचा वार हुकविल्याने तो थोडक्यात बचावला. परंतु साहिल पुरी याने चाकूचा दुसरा वार संदीप गेडाम याच्या पार्श्व भागावर केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. चाकूचा वार केल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला. आरोपीने चाकू मारून गंभीर जखमी केलेल्या संदीप गेडामला त्याच्या मित्रांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान संदीप गेडाम (३४) रा. खडबडा मोहल्ला याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी साहिल पुरी याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला. गुन्हे शोध पथकाकडे तपासाची सूत्रे देण्यात आल्यानंतर पथकाने शीघ्र तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच आरोपीचा शोध लावला. भालर रोडवरील जंगल भागात लपून बसलेल्या आरोपीला डीबी पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. दारूसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी भादंवि च्या कलम ३०७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. २७ ऑक्टोबरला ही घटना घडली असून त्याला आज २८ ऑक्टोबरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अगदी कमी वयात साहिल हा अट्टल गुन्हेगार बनला. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हांची नोंद आहे. अनेक चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे. कर्तृत्व घडविण्याच्या वयात तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला. गुन्हेगारी प्रवृत्तीतून तो दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला. पण गुन्हेगाराला शेवटी तुरंगवारी घडतेच, याचा मात्र त्याला विसर पडला होता.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख सपोनि दत्ता पेंडकर, डीबी पथकाचे विकास धडसे, भानुदास हेपट, शुभम सोनुले, सागर सिडाम यांनी केली.
No comments: