भर वस्तीतून हायवा टिप्पर चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे शोध पथकाने काही तासांतच आवळल्या मुसक्या
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातून दोन मालवाहू हायवा टिप्पर चोरीला गेल्याची घटना २७ ऑक्टोबरला उघडकीस आली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून वाहनांचा शोध घेणे सुरु केले. वणी वरोरा या रहदारीने गजबजलेल्या मार्गावरील लॉर्ड्स बियरबार समोर खुल्या जागेत उभे असलेले हायवा टिप्पर चोरट्यांनी चोरून नेल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे शोध पथक यांच्याकडे चोरी प्रकरणाचा शीघ्र छडा लावण्याची जबाबदारी देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत चोरट्यांचा कसून शोध घेणे सुरु केले. आसपासच्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेरे तपासण्यात आले असता चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबी तपासून चोरट्यांचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करतांनाच पोलिस पथकाने खबऱ्यांनाही अलर्ट केले. शेवटी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला चोरट्यांचा सुगावा लागला. चोरट्यांनी लंपास केलेले टिप्पर यवतमाळ येथे उभे असल्याची गोपनीय माहिती पोलिस पथकाला मिळाली. पोलिस पथकाने जराही वेळ न दवडता यवतमाळ येथे जाऊन दोनही हायवा टिप्पर ताब्यात घेतले. तसेच टिप्पर चोरून नेणाऱ्या तीन चोरट्यांना अटक केली.
शहरातील एकता नगर परिसरात वास्तव्याला असलेल्या समीर परवेज रफिक रंगरेज यांच्या मालकीचे दोन हायवा टिप्पर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार तसलिम समीर रंगरेज यांनी पोलिस स्टेशनला नोंदविली. वणी वरोरा मुख्य मार्गावरील लॉर्ड्स बियरबार समोर खुल्या जागेत उभे असलेले टिप्पर चोरट्यांनी लंपास केल्याने चांगलीच खळबळ माजली. भर वस्तीतून टिप्पर चोरीला गेल्याने पोलिसही अवाक झाले. चोरट्यांनी दाखविलेल्या हात चलाखीने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. वर्दळीच्या ठिकाणावरून टिप्पर चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले. या चोरी प्रकरणाचा शीघ्र छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे शोध पथकावर देण्यात आली. दोनही पथकांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच चोरट्यांचा शोध लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे शोध पथकाने तपासाला योग्य दिशा देत कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून हायवा टिप्परचा शोध लावला, व चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. २७ ऑक्टोबरला टिप्पर चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर २८ ऑक्टोबरला पोलिस पथकाने या चोरी प्रकरणाचा छडा लावला.
यवतमाळ येथील आर्णी बायपास मार्गावरील एका धरमकाट्याजवळ खुल्या जागेत चोरट्यांनी चोरून नेलेले दोनही टिप्पर उभे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. यवतमाळ येथीलच मो. शगीर मो. जाबीर अन्सारी याने हे टिप्पर चोरून आणल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ यवतमाळ येथे जाऊन मो. शगीर मो. जाबीर अन्सारी याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीत सहभागी असलेल्या आपल्या अन्य साथीदारांचीही नावे सांगितली. त्याच्याकडे कामाला असलेल्या कुंदन ओमप्रकाश तिजारे (२८) व निकेश नामदेव वासनिक (२३) दोघेही रा. नागपूर यांनी हायवा टिप्पर चोरी करण्यात मदत केल्याचे अन्सारी याने कबुल केल्यानंतर पोलिस पथकाने तीनही आरोपींना अटक करीत त्यांनी चोरी केलेले हायवा टिप्पर (MH ३४ BG ९४५२, MH ३४ BG १२१२) ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरट्यांकडून दोन हायवा टिप्पर किंमत २७ लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली एक आलिशान कार किंमत १० लाख रुपये असा एकूण ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, ठाणेदार अजित जाधव, सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, सपोनि माधव शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, नरेश राऊत, सतीश फुके, गुन्हे शोध पथकाचे सुदर्शन वानोळे, इकबाल शेख, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वसीम शेख, गजानन गेडाम यांनी केली.
No comments: