वणी रेल्वे क्रॉसिंगवर कोळसा वाहतुकीच्या ट्रकने कारला नेले फरफटत, प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून टळला मोठा अनर्थ
प्रशांत चंदनखेडे वणी
कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने कारला धडक देत काही अंतरापर्यंत अक्षरशः फरफटत नेल्याची थरकाप उडविणारी घटना काल २९ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वणी वरोरा राज्य महामार्गावरील रेल्वे क्रॉसिंग येथे घडली. दैव बलवत्तर म्हणून कारमधील प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही. कारमध्ये एक महिला व दोन पुरुष असे तीन जण प्रवास करीत होते. आणखी काही अंतर ट्रकने कारला फरफटत नेले असते तर मोठा अनर्थ घडला असता. ट्रक हा कारला फरफटत नेत असल्याचे लक्षात येताच अन्य वाहन धारकांनी आरडाओरड केल्याने ट्रक चालकाने करकचून ब्रेक लावले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, व कार मधील प्रवाशी थोडक्यात बचावले.
कोळसा वाहतूक करणारा ट्रक कोळसा खाली करून घुग्गुसकडे जात असतांना रेल्वे क्रॉसिंग जवळ या ट्रकने कारला धडक देत अक्षरशः फरफटत नेले. रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांची वर्दळ असल्याने कार चालक हळूहळू कार पुढे नेत असतांना कोळसाखाणीत जाण्याच्या लगबगीत ट्रक चालकाने ट्रक पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. रेल्वे क्रॉसिंग वरील अरुंद रस्त्यावरून आताताईपणे वाहन पुढे रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकाने कारला धडक देत अक्षरशः फरफटत नेले. प्रवाशांचे नशीब बलवान म्हणून त्यांना कुठलीही इजा झाली नाही. अन्य वाहधारकांची आरडाओरड ऐकून ट्रक चालकाने करकचून ब्रेक लावल्याने कार अपघातग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावली. आणि मोठा अनर्थ टळला. कार मधील कुणालाही इजा झाली नसली तरी या घटनेने सर्वांच्या अंगावर मात्र शहारे आले. वणी वरोरा व घुग्गुस मार्ग कोळसा वाहतुकीच्या वाहनांनी नेहमी गजबजलेला असतो. कोळसा वाहतुकीची वाहने कोळसाखाणींतून जास्तीतजास्त चक्कर लागाव्या म्हणून सुसाट धावतांना दिसतात. ट्रक चालकांच्या आताताईपणामुळे अनेक अपघात घडले असून या अपघातात अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. कोळसा वाहतुकीच्या वाहनांचा वेग जीवघेणा ठरू लागला असून कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगाला आवर घालण्याची मागणी होऊ लागली आहे.
No comments: