कोळसाखाणीत करण्यात येणाऱ्या शक्तिशाली ब्लॉस्टिंगमुळे नागरिकांचं जीवन हादरलं
प्रशांत चंदनखेडे वणी
वेकोलिच्या कोळसाखाणीत नियमांचं पालन न करता तीव्र स्वरूपाची ब्लॉस्टिंग केली जात असल्याने जमिनीला हादरे बसून घरांना तडे जाऊ लागली आहेत. कोळसाखाणीतील शक्तिशाली ब्लॉस्टिंगमुळे भूकंपाचे झटके आल्यागत जमीन हादरली जात असून यामुळे घरांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. कोळसाखाणीतील ब्लॉस्टिंगमुळे ६ ते ७ किमी पर्यंत जमिनीला हादरे बसत असल्याने मजबूत बांधकामानंतरही भिंतींना तडे जाऊ लागली आहेत. कोळसाखानी लगत असलेल्या गावातील घरांचे तर अवसान गळाल्याचे पहायला मिळते. ब्लॉस्टिंगमुळे भिंतींना तडेच नाही तर मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. काही घरांचे तर छत गळून पडले आहे. कोळसाखानी लगत असलेल्या गावातील नागरिक भीतीच्या सावटात जिवन कंठत आहेत. ब्लास्टिंगमुळे जमिनीला बसणाऱ्या हादऱ्यांनी आसपासच्या गावातील नागरिक पुरते हादरले आहेत. कोळसाखाणीत नियमांना धाब्यावर बसवून करण्यात येणाऱ्या ब्लॉस्टिंगमुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. ब्लॉस्टिंगमुळे नागरिकांचे जीवनच हादरले असून तक्रारींचा खच पडला असतांनाही जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत अनेक भूमिगत व खुल्या कोळसाखानी आहेत. कोलारपिंपरी, पिंपळगाव, जुनाड, उकनी, नायगाव, निलजई, कुंभारखनी, घोन्सा या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोळसाखाणीतून मोठ्या प्रमाणात कोळशाचं उत्खनन करून हा कोळसा वीज प्रकल्प व कोळशावर आधारित उद्योगांना पाठविला जातो. विद्युत प्रकल्पांची कोळशाची भूक भागविणारा वणी तालुका मात्र नेहमीच उपेक्षित राहिला आहे. कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या समस्या न संपणाऱ्या आहेत. न संपणारा जीवन संघर्ष कोळसाखाणींमुळे सुरु झाला आहे. कास्तकारांच्या जमिनी ऐटुन वेकोलिने कोळशाच्या खाणी निर्माण केल्या असून तालुक्यात कोळसाखाणींचं जाळंच तयार झालं आहे. कोळसाखाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांचं आयुष्य घटू लागलं आहे. शेत पिकांचं मोठं नुकसान होऊ लागलं आहे. रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. कोळसाखाणींमुळे नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहे. भूगर्भातील कोळसा बाहेर काढण्याकरिता २०० ते ३०० फुट खोल खड्डे केले जात असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी घटू लागली आहे. जमिनीतील पाण्याचे स्रोत आटू लागल्याने कोळसाखानीलगत असलेल्या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. कोळसाखाणीमुळे नागरिकांचं जीवन काळवंडलं आहे. कोळसाखाणींमुळे नागरिकांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम सर्वश्रुत असतांना लोकप्रतिनिधी व राजकारणी थातुरमातुर आंदोलनं करून आपली राजकीय पोळी भाजताना दिसत आहे. वेकोलिच्या दुष्परिणामांशी जनतेचा रोजचाच संघर्ष सुरु असतांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता कुणीही प्रखरतेने पुढे येतांना दिसत नाही. अनेक वर्षांपासून जनता कोळसाखाणींच्या समस्यांशी झुंजत आहे. पण वेकोलिचे अधिकारी मात्र समस्यांना गांभीर्याने घेतांना दिसत नाही. लोकप्रतिनिधी व राजकारण्यांचा प्रभाव वेकोलि अधिकाऱ्यांवर पडतांना दिसत नाही. आमचं सरकार येऊ द्या, या राजकारण्यांच्या नुसत्या पोकळ वल्गना असतात. लोकप्रतिनिधींचे चेहरे बदलतात, पण समस्या मात्र सुटतांना दिसत नाही.
कोळसाखाणीत नियमांना धाब्यावर बसून करण्यात येणाऱ्या ब्लॉस्टिंगमुळे नागरिकांची घरे कोसळण्याच्या मार्गावर आली आहेत. ब्लॉस्टिंगमुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. शक्तिशाली ब्लॉस्टिंगमुळे जमिनीला भूकंपागत हादरे बसतात. ६ ते ७ किमी पर्यंत त्याची तीव्रता जाणवते. वेळी अवेळी होणाऱ्या ब्लॉस्टिंगमुळे नागरिक भीतीच्या सावटात आले आहेत. घरांना तडेच नाही तर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. काही घरांची तर छत गळून पडली आहेत. कोळसाखाणींत करण्यात येणाऱ्या शक्तिशाली ब्लॉस्टिंगमुळे नागरिकांचे घरात राहणे कठीण झाले आहे. ब्लॉस्टिंगमुळे केंव्हा कुठला अनर्थ घडेल याची शाश्वतीच राहिलेली नाही. मुजोर वेकोलि प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आणि राजकारणी समस्यांना घेऊन केवळ राजकारण करीत असल्याची उद्विग्नता नागरिकांमधून व्यक्त करू लागले आहे. ब्लॉस्टिंगमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कोणतं घर कधी कोसळेल याचा नेमच राहिलेला नाही. त्यामुळे राजकारण्यांनी समस्यांचं केवळ राजकारण न करता वेकोलि अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसून समस्या सोडविण्याची मागणी समस्याग्रस्त नागरिकांमधून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment