तुम्ही नियमित पाणीकर भरा, आम्ही अनियमित व अशुद्ध पाणी पुरवठा करतो, न.प. प्रशासन

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी नगर पालिका प्रशासन शहरात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. मागील अनेक वर्षांपासून शहरात दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. कोट्यावधींचा निधी शहरवासियांची पाण्याची समस्या सोडविण्याकरिता खर्च करण्यात आला. पण जलशुद्धीकरण यंत्र दुरुस्ती करण्याचं सौजन्य मात्र दाखविण्यात आलं नाही. नगर पालिका प्रशासन निधी उधळण्याची कुठलीही संधी दवडत नाही. जेथे आपला फायदा, त्या कामाचा वायदा हे धोरण नगर पालिका प्रशासनाने अवलंबले आहे. जनतेचा पैसा मूलभूत सोइ सुविधांवर खर्च न करता अनावश्यक कामांवर प्रचंड उधळला जात आहे. शहरवासियांकडून सक्तीने पाणीकर वसूल करण्यात येतो. पण तेवढीच तत्परता पाणी पुरवठ्याबाबत पाळली जात नाही. अनेक वर्षांपासून नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असतांना नगर पालिका प्रशासनाने आंधळेपणाचं सोंग घेतलं आहे. जबाबदार अधिकारीही दूषित पाणी पुरवठ्याची समस्या गांभीर्याने घेतांना दिसत नाही. लोकप्रतिनिधीही मूग गिळून चूप बसले आहेत. नळाद्वारे येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. शहरवासियांमध्ये जलजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. साथीच्या आजारांनी शहरात थैमान घातले आहे. उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो, टायफॉईड यासारखे आजार दूषित पाण्यामुळे होतांना दिसत आहे. शहरात या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून या गंभीर आजारांशी अनेक जण झुजतांना दिसत आहेत. शहरवासीयांना होणारा दूषित पाणी पुरवठा हा नगर पालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचं जिवंत उदाहरण आहे. नगर पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे बंद न केल्यास दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सुटेपर्यंत बेमुद्दत आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

नगर पालिका प्रशासन शहरवासीयांना मूलभूत सोइ सुविधा पुरविण्यात अपयशी ठरू लागलं आहे. शहरात अस्वच्छता निर्माण झाली असून शहरवासीयांना अशुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अनियंत्रित झाला असून कंत्राटदारावरही कुणाचं नियंत्रण राहिलेलं नाही. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काही पाईपलाईन अतिशय जुन्या झाल्या असून त्या वेळोवेळी फुटत असल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होतो. पाईप लाईन फुटली की, ती कधी दुरुस्त होईल याची शाश्वती नसते. कंत्राटदाराच्या मनात येईल तेंव्हा पाईप लाईनची दुरुस्ती केली जाते. नगर पालिका प्रशासनाचा कारभार सुस्तावलेला दिसून येत आहे. शहरात समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. काही प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्याच्या कडेला कचरा साचला आहे. नाल्यांची साफसफाई देखील वेळेवर होतांना दिसत नाही. घंटा गाडीचही वेळापत्रक कोलमडलं आहे. धूर फवारणीही नियमित होतांना दिसत नाही. दूषित पाणी पुरवठा तर शहरवासीयांच्या पाचवीलाच पूजला आहे. मागील अनेक वर्षांपासून शहरवासीयांना दूषित पाणी पुरवठा होतो आहे. नळाद्वारे अतिशय गढूळ पाणी येत असून नळाच्या पाण्यात जंतूही आढळतात. जलशुद्धीकरण यंत्र मागील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. नगर पालिका प्रशासनाकडून अनावश्यक कामांवर निधी उधळण्यात येतो, पण शुद्ध पाणी पुरवठा करण्यावर मात्र निधी खर्च केला जात नाही. पाणी करात अवाढव्य वाढ करण्यात आली. पण शुद्ध पाणी पुरवठा करण्याची नगर पालिकेला आवश्यकता नाही वाटली. नळाद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. नागरिकांना विविध साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. विषाणूजन्य आजारात मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना अनेक गंभीर आजार जडले आहेत. डेंग्यू टायफॉईड सारखे आजार शहरवासियांमध्ये बळावले आहेत. या आजारांवर उपचार घेतांना नागरिकांवर आर्थिक संकट ओढावू लागलं आहे. अस्वच्छता व अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिक विविध आजारांना बळी पडू लागले असून नगर पालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे बंद न केल्यास बेमुद्दत आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेच्या वतीने न.प. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी