स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या वितरकाचा परवाना रद्द, इसी ऍक्ट (E.C. Act ) नुसार कार्यवाही न झाल्याने चर्चेला उधाण
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील बेसा (लाठी) या गावातील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळत नसल्याने ते कमालीचे वैतागले होते. अशातच गावकऱ्यांनी स्वस्त धान्य वितरकाचा धान्याने भरलेला ऑटोच रोखून धरत वितरकाचे पितळ उघडे पाडले. स्वस्त धान्य दुकानात धान्य शिल्लक नसतांना वितरकाने बाहेरून धान्य आणले. ऑटोत धान्य भरून आणत असतांना गावकऱ्यांनी वितरकाला रंगेहाथ पकडले. स्वस्त धान्य दुकानदार हा शासकीय योजनेतील धान्याचा काळाबाजार करीत असल्याची शंका आल्याने गावकऱ्यांनी वितरकाची प्रशासनाकडे तक्रार केली. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठा तपासाला असता त्यात मोठी तफावत आढळून आली. दुकानदाराने शासकीय धान्यात अफरातफर केल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदारांनी तसा अहवाल तयार करून जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने दादाजी जनार्धन वाघमारे यांचा स्वस्त धान्य वितरणाचा परवाना रद्द करून त्यांच्यावर दंड ठोठावला आहे. ही कार्यवाही २२ सप्टेंबरला करण्यात आली.
गोरगरिबांच्या उदर्निवाहाकरिता शासनाकडून पुरविण्यात येणारे धान्य स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वितरित केले जाते. परंतु स्वस्त धान्य दुकानदारच गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला मारू लागले आहेत. लाभार्थ्यांना धान्यच उपलब्ध झाले नसल्याच्या भूलथापा देऊन वितरक रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करू लागले आहेत. रेशन दुकानातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या बेसा येथील दुकानदाराला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. लाभार्थ्यांना धान्यच वितरित झाले नसतांना धान्यसाठा गेला तरी कुठे, हा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला असता वितरक गावकऱ्यांवरच बिथरला. धान्याबाबत चौकशी करणाऱ्या गावकऱ्यांशीच परवानाधारक अरेरावी करू लागल्याने गावकऱ्यांनी त्याची प्रशासनाकडे तक्रार केली. गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठा तपासाला असता त्यात तफावत आढळून आली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराने शासकीय धान्यात अफरातफर केल्याचा अहवाल तहसिदारांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविला. त्यानुसार स्वस्त धान्य वितरकावर इसी ऍक्ट (E.C. Act, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार) अंतर्गत कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता पुरवठा विभागाने भ्रष्ट वितरकालाच धान्य साठा उपलब्ध करून दिला. परंतु जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्याच्याकडून धान्य वितरणाची जबाबदारी काढून घेण्यात आली. वणी तालुका पुरवठा विभाग संबंध जोपासण्याला महत्व देत असून रेशन दुकानदारांशी संबंधितांचे हित संबंध निर्माण झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या योग्य कालावधीत बदल्या होत नसल्याने त्यांचे आपल्या कार्यक्षेत्रात हित संबंध प्रस्थापित होतात. त्यामुळे कार्तव्यात प्रामाणिकता रहात नाही. टेबलाखालची सवय जडली की त्यांना कर्तव्यदक्षतेची जाणीवच उरत नाही. शहरासह तालुक्यात स्वस्त धान्य वितरकांबाबत लाभार्थ्यांच्या मोठ्या तक्रारी आहेत. पण त्यांच्या तक्रारींचे निवारण होतांना दिसत नाही.
बेसा (लाठी) येथे दादाजी जनार्धन वाघमारे यांना स्वस्त धान्य वितरणाचा परवाना देण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शासकीय योजनेतील धान्य गोरगरिबांना नाममात्र दर आकारून पुरवलं जातं. परंतु परवानाधारक गोरगरिबांच्या तोंडचा घास हिसकावू लागले आहेत. शासकीय योजनेतील धान्य काळ्याबाजारात विकून स्वतःचे हित साधू लागले आहेत. बरेच स्वस्त धान्य वितरक कंट्रोलच्या धान्यात अफरातफर करून गब्बर झाले आहेत. गोरगरिबांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून पुरविण्यात येणारे धान्य वितरकच आपल्या घशात घालू लागल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित राहू लागले आहेत. स्वस्त धान्य दुकानदार धान्याचा काळाबाजार करीत असतांना पुरवठा विभागाला याचा जराही सुगावा लागू नये, याचेच नवल वाटते. बेसा (लाठी) या गावातील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी सुरु होत्या. सणासुदीचे दिवस असतांना रेशनचे धान्य मिळत नसल्याने गावकऱ्यांनी दुकानदारावर प्रश्नांचा भडीमार केला. गावकरी आक्रमक झाल्याचे पाहून स्वस्त धान्य दुकानदाराने बाहेरून ऑटोने धान्य आणले. परंतु गावकऱ्यांनी दुकानदाराचा धान्याने भरलेला ऑटोच रोखून धरला. लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही, व दुकानात धान्य शिल्लक नाही, मग हे धान्य आणले कुठून हा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला. स्वस्त धान्य दुकानदार धान्याचा काळाबाजार करीत असल्याची गावकऱ्यांना शंका आल्याने त्यांनी सरळ प्रशासनाकडे दुकानदाराची तक्रार केली. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून तहसीलदार निखिल धुळधर यांनी बेसा (लाठी) येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठा तपासाला असता त्यात मोठी तफावत आढळून आली. गावकऱ्यांनीही अद्याप धान्य न मिळाल्याच्या तक्रारी तहसिदारांकडे केल्या. यावरून स्वस्त धान्य दुकानदाराने शासकीय धान्यात अफरातफर केल्याचे तहसिदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तसा अहवाल तयार करून जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविला. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानदारावर इसी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही होणे अपेक्षित असतांना त्या भ्रष्ट वितरकालाच धान्य साठा उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने आदेश पारित करून परवाना धारकाचा धान्य वितरणाचा परवाना रद्द केला. तसेच त्याच्यावर दंडही थोटावण्यात आला आहे.दादाजी जनार्धन वाघमारे यांच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य साठ्याची तपासणी केली असता तेथे गहू ८ क्विंटल ८४ किलो किंमत २३,४६९ रुपये, तांदूळ १३ क्विंटल ६४ किलो किंमत ५२,६२५ रुपये, साखर ३३ किलो किंमत १३४३ रुपये असा एकूण ७७,४३७ रुपये किंमतीचा धान्य साठा कमी आढळून आला. परवानाधारकाने धान्यात अफरातफर केल्याचे दिसून येत असल्याने त्याने ७७,४३७ रुपये ही रक्कम शासन खजिन्यात जमा करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे. तसेच परवानाधारकाने महाराष्ट्र अनुसूचित वस्तू वितरणाचे विनियमन १९७५ व त्या अटी, शर्थींचे उल्लंघन केल्याने त्याच्याकडील प्राधिकर पत्राच्या १०० टक्के अमानत रक्कमेएवढी रक्कम दंड म्हणून वसूल करण्याची सूचना तहसीलदारांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दादाजी जनार्धन वाघमारे यांचा स्वस्त धान्य वितरणाचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment