दीपक चौपाटी परिसर बनला गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा, चाकूच्या धाकावर वेकोलि कर्मचाऱ्याला लुटले
प्रशांत चंदनखेडे वणी
दीपक चौपाटी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावू लागली असून हा परिसर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा बनला आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं या परिसरात वास्तव्य असल्याने हा परिसर नेहमीच गुन्हेगारी कारवायांनी चर्चेत असतो. विनाकारण कुणाशीही वाद घालून मारहाण करणे या परिसरात नित्याचेच झाले आहे. शुल्लक कारणावरून मारहाण करणे तसेच जीवघेणे हल्ले करण्याच्या घटनाही दीपक चौपाटी परिसरात नेहमी घडतांना दिसतात. चोरी व लुटपाटीच्या घटनांमुळे हा परिसर नेहमी गाजलेला असतो. गुंड प्रावृत्तीच्या युवकांचे टोळके या परिसरात सक्रिय असून त्यांनी या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. दीपक चौपाटी मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अडवून लुटपाट करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे नागरिकांचे या मार्गाने मार्गक्रमण करणे कठीण झाले असून हा परिसर नागरिकांसाठी असुरक्षित ठरू लागला आहे.
२५ नोव्हेंबरला दीपक चौपाटी परिसरात घडलेल्या लुटपाटीच्या घटनेने या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. वेकोलिच्या वतीने कुचना येथे आयोजित क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याकरिता आलेल्या उमरेड येथील वेकोलि कर्मचाऱ्याला दीपक चौपाटी परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने धास्तावलेल्या वेकोलि कर्मचाऱ्याने वणी पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शीघ्र तपासचक्रे फिरविली, व प्रेमनगर परिसरातून चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी या चारही आरोपींवर लुटपाट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
उमरेड येथील रहिवासी असलेले शैलेंद्र मोहन सिंग हे वेकोलि द्वारा कुचना येथे आयोजित क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याकरिता आले होते. वेकोलिच्या उमरेड येथीलच कोळसाखाणीत ते कर्तव्यरत आहेत. क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर ते आपला मित्र उमाकांत पाल यांच्यासोबत वणी येथे फेरफटका मारण्याकरिता दुचाकीने आले होते. दीपक चौपाटी परिसरातील बारमध्ये मद्य सेवन केल्यानंतर ते लघुशंका करण्याकरिता खुल्या मैदानात गेले असता त्यांना तीन जणांनी घेरले. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मोबाईल, खिशातील पैशाचं पाकीट व दुचाकीची चावी हिसकावून त्यांनी पळ काढला. शैलेंद्र सिंग यांच्या पाकिटमध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड, एटीएम, ३ हजार रोख रक्कम तथा थायलंड चलनाच्या तीन नोटा होत्या. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून बळजबरी त्यांच्या जवळील मुद्देमाल लुटून नेल्याने शैलेंद्र सिंग यांनी सरळ वणी पोलिस स्टेशनला धाव घेतली. त्यांनी घडलेल्या घटनेची रीतसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून शीघ्र तपासचक्रे फिरविली व अवघ्या काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये शेख इरफान शेख सलीम (२४), शेख शाहरुख शेख सलिम (२३),विजय भारत गेडाम व इतर एक जण अशा चार जणांचा समावेश असून पोलिसांनी त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, डीबी पथकाचे विकास धडसे, सागर सिडाम, भानुदास हेपट यांनी केली. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि दत्ता पेंडकर करीत आहे.
Comments
Post a Comment