एकाच दिवशी दोन कोंबड बाजारांवर धाडी, शिरपूर पोलिसांची धडक कार्यवाही

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील लाठी, पिंपरी गावालगत जंगल शिवारात भरविण्यात येणाऱ्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकून कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. लाठी व पिंपरी गावालगत असलेल्या जंगल शिवारात कोंबड बाजार भरवला जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथक तयार करून या दोन्ही कोंबड बाजारांवर धाडी टाकल्या. शिरपूर पोलिसांच्या या धडक कार्यवाहीमुळे कोंबड बाजार भरविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या पाच आरोपींना रंगेहात अटक केली असून घटनास्थळावरून २०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुगाराचे व्यसन जडलेले अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून पैशाचा जुगार खेळतांना दिसतात. आता तर मोबाईलवरच जुगार खेळण्याचे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र ऑनलाईन जुगारावर कायद्याची बंधनं नसल्याने हा जुगार बिनधास्त चालतो. क्रिकेट सामन्यांवरही पैशाची बाजी खेळण्याकरिता ऑनलाईन ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ऍप वरून क्रिकेट सामन्यांवर पैशाचा जुगार खेळणारेही कमी नाहीत. लुडोवर देखिल पैशाचा गेम खेळण्यात मग्न असणारे अनेक जण पहायला मिळतात. जुगाऱ्यांना जुगार खेळण्याचं फक्त माध्यम पाहिजे. कारण काही जण जुगाराच्या अगदीच अधीन गेले आहेत. कोंबड्यांच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळण्याचंही अनेकांना व्यसन जडलं आहे. जंगल शिवारात निर्जनस्थळी कोंबडे भांडविणारी मंडळी एकत्र येऊन कोंबड बाजार भरविला जातो. जुगार खेळणाऱ्या लोकांची जत्रा म्हणजेच कोंबड बाजार. मद्रासी जातीचे ५ ते १० हजार रुपये किंमत असलेले कोंबडे जोड लावून भांडविले जातात. या कोंबड्यांवर दोन्ही बाजूंनी मोठमोठी रक्कम लावली जाते. झुंजीत जो कोंबडा जिंकतो, त्या कोंबड्यावर पैसा लावणारे जुगार जिंकतात. तालुक्यात हा जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो. 

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लाठी व पिंपरी या गावालगत असलेल्या जंगल शिवारात कोंबड बाजार भरवला जात होता. याची कुणकुण शिरपूर पोलिसांना लागली. पोलिसांनी एकाच दिवशी दोनही कोंबड बाजारांवर धाडी टाकल्या. ठाणेदार संजय राठोड यांनी पोलिस पथक तयार करून कोंबड बाजारावर धाडसत्र अवलंबलं. लाठी जंगल शिवारात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी मोठ्या शिताफीने धाड टाकून दीपक वारलू तेलंग रा. बेसा व सुरेंद्र किसन पिंपळकर रा. चिखली या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांनी रोख ९८० रुपये व लोखांडी काती असा एकूण १०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर पिंपरी येथील कोंबड बाजारावर धाड टाकून पोलिसांनी शालिक नामदेव तुराणकर, संतोष तुकाराम टेकाम, जावेद कालू शेख तिघेही रा. नेरड(पुरड) यांना अटक केली. त्यांच्या जवळून पोलिसांनी रोख ९०० रुपये व लोखंडी काती असा एकूण १००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या पाचही आरोपींवर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी