श्री महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने जपली भारतीय संस्कृती, माजी खासदार हंसराज अहिर


प्रशांत चंदनखेडे वणी 

नंदीग्राम एक्सप्रेस मधील प्रवाशांना भर उन्हात पाणी वाटप करून मानवी संवेदना जपतांनाच माणुसकीचं दर्शन घडविणाऱ्या श्री महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने भारतीय संस्कृतीला पूरक असं मानवसेवेचं प्रेरणादायी कार्य केलं आहे. उष्णतेने कासावीस व तहानेने व्याकुळ झालेल्या जीवांना पाणी पाजून या संस्थेने भारतीय संस्कृतीचा आदर्श जपला आहे. मानवसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचा संदेश त्यांनी या कौतुकास्पद कार्यातून दिला आहे. सेवाभावी कार्यांसाठी आर्थिक मदत कुणीही करतो, पण शारीरिक श्रम घेऊन या संस्थेनं खऱ्या अर्थाने सेवाभाव जपला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार हंसराज अहिर यांनी काढले. ते श्री महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सत्कार व समारोप समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. श्री महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वणी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी उन्हाळयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पेयजल वितरणाच्या या कार्यात अनेकांनी हातभार लावला. रखरखत्या उन्हात त्यांनी प्रवाशांना पाणी वाटप केले. या सर्व श्रमदात्यांचा सत्कार व पेयजल वितरणाचा समारोप समारंभ काल २४ जूनला सायंकाळी बाजोरिया लॉन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर होते. 

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया, वणी रेल्वे स्टेशन प्रबंधक एस. पी. सिंह, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष चंद्रकुमार चोरडिया, श्री महावीर सेवा समितीचे अध्यक्ष अशोक भंडारी, सुरेश खिवंसरा, राजाभाऊ पाथ्रडकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे हे उपस्थित होते. मंचकावर विराजमान मान्यवरांच्या हस्ते पेयजल वितरणात अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचाच सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्री महावीर बहूउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील या समारंभात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनचे प्रबंधक आर. पी. सिंह यांनी या सेवाभावी कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचाही यावेळी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच रेल्वे कर्मचारी कविता राजूरकर यांनी पेयजल वितरणात केलेल्या सहकार्याची संस्थेकडून स्तुती करण्यात आली. बल्लारशा ते मुंबई व मुंबई ते बल्लारशा जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस मधील प्रवाशांना श्री महावीर बहुउद्देशीय संस्था वणी द्वारे उन्हाळाभर पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या पेयजल वितरणाचा समारोप समारंभ बाजोरिया लॉन येथे पार पडला. 
हंसराज अहिर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलतांना म्हटले की, २००८ मध्येच नंदीग्राम एक्सप्रेस सुरु करण्याचे ठरले होते. परंतु दरम्यान बल्लारशा येथून सेवाग्राम एक्सप्रेस सुरु करण्यात आली. त्यामुळे नंदीग्राम एक्सप्रेस सुरु करण्याला विलंब झाला. भविष्यात वणी मार्गे आणखीही प्रवाशी रेल्वे सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. वणी रेल्वे स्टेशनवर इतरही सोइ सुविधा पुरविण्यात येणार आहेत. वणी रेल्वे स्टेशनचा दर्जा सुधारण्याचाही मानस आहे. नागपूर वरून धावणारी नंदीग्राम एक्सप्रेस कोरोना काळात बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. वणी मार्गे दररोज धावणारी नंदीग्राम एक्सप्रेस ही एकमेव गाडी होती. कोरोना काळात ती बंद करून नंतर आदिलाबाद पर्यंतच ती चालविण्यात आली. मात्र ही प्रवासी रेल्वे आता बल्लारशापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे महांकाली दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांना या गाडीचा मोठा लाभ मिळणार आहे. नागपूर वरून नंदीग्राम सुरु असतांना आदिलाबाद वरूनच या रेल्वेत प्रवाशांची गर्दी वाढायची. त्यामुळे ही रेल्वे बल्लारशा पर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे स्टेशनला लागून असलेली वेकोलिची कोळसा सायडिंग ही शहरवासीयांची व प्रवाशांचीही मुख्य समस्या बनली आहे. रेल्वे स्टेशनचं सौंदर्य कुरूप करणारी व वातावरण प्रदूषित करणारी ही कोळसा सायडिंग येथून हटविण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून या सायडिंगसाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण होताच ही सायडिंग येथून हटविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मंचकावर उपस्थित मान्यवरांनीही आपापले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आनंद झामड यांनी तर आभार प्रदर्शन शुभम छाजेड यांनी केले. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी