कारची दुचाकीला मागून जोरदार धडक, एक ठार तर एक गंभीर जखमी
प्रशांत चंदनखेडे वणी
भरधाव कारने चालत्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 26 जूनला दुपारी वणी वरोरा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ घडली. शुभम सुशीलकुमार रॉय (38) रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर साजिद इस्राईल शेख (२७) रा. कडोली ता. राजुरा असे जखमीचे नाव आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
वणी वरून चंद्रपूरला जात असलेल्या दुचाकीला (MH 29 BL 9259) रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या भरधाव कारने (MH 34 BR 8065) मागून जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीस्वार चेंडू सारखे उसळून कारच्या समोरील काचेवर आदळले. कार चालक चंद्रकांत लक्ष्मण धानोरकर (32) रा. वरोरा हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत असल्याचे सांगण्यात येत आहे. अती मद्य सेवन करून कार चालाविल्यामुळे हा अपघात घडला. आणि एका निष्पाप जीवाचा बळी गेला. कार चालक हा वणी रेल्वे विभागात कार्यरत असून आज रेल्वे युनियनची निवडणूक असल्याने तो चांगलाच झिंगाट झाल्याचे बोलल्या जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणी करीता तर जखमीला उपाचार्थ ग्रामीण रुग्णालयात हलविले. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेली कार ताब्यात घेत पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment