एलसीबी पथकाची धडाकेबाज कार्यवाही, दरोड्यातील फरार आरोपींना नागपूर येथून केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
खाजगी प्रवासी वाहनाला भर रस्त्यात अडवून वाहन चालकाला चाकूच्या धाकावर लुटल्याची खळबळजनक घटना ७ जूनला वणी करंजी मार्गावरील गोघुलधरा फाट्यावर घडली होती. वाहन चालकाला लाकडी दांड्याने जबर मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम बळजबरीने हिसकावाल्याची तक्रार मारेगाव पोलिस स्टेशनला करण्यात होती. पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींवर गुन्हे दाखल केले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी शीघ्र तपास चक्रे फिरवून दरोड्यातील दोन आरोपींना तात्काळ अटक केली. तर इतर आरोपींचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात होता. फरार आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथकेही गठीत करण्यात आली होती. अशातच स्थानिक गुन्हे शाखा पथकाला आरोपींचा सुगावा लागला. पथकाने नागपूर रेल्वे स्टेशन येथून तीन दरोडेखोरांना अटक केली आहे. हे तिघेही महाराष्ट्राबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नागपूर येथून मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली. गुन्हेगारांचा शोध लावण्याच्या कौशल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा पथक नेहमीच प्रशंसनेस पात्र ठरलं आहे.
पांढरकवडा येथून वणीला प्रवासी घेऊन येणाऱ्या खाजगी प्रवासी वाहनाला खेकडवाई गावाजवळ अडवून सलिम सुलतान गिलानी (४४) रा. करंजी या वाहन चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. यवतमाळ कडून स्कॉर्पियो वाहनाने आलेल्या दरोडेखोरांनी सलिम गिलानी या वाहन चालकाला भर रस्त्यात अडवून लाकडी दांड्याने जबर मारहाण करतांनाच त्याच्या पोटाला चाकू लावून त्याचे अपहरण केले. सलिम गिलानी याला घोगुलधरा फाट्यावर नेत तेथेही त्याला मारहाण करून आरोपींनी चाकूच्या धाकावर त्याच्या जवळील २० हजार ९०० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. नंतर त्यांनी तेथून पळ काढला. घडलेल्या घटनेने भयभीत झालेल्या सालिमने मारेगाव पोलिस स्टेशनला येऊन नरेश जैस्वाल रा. यवतमाळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध लुटपात व मारहाण केल्याची तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३९५, ३६४(अ), ३२६, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून दरोड्यातील दोन आरोपींना तात्काळ अटक केली. परंतु मुख्य आरोपीचे साथीदार मात्र पोलिसांच्या हाती लागले नव्हते. पोलिस त्यांचा कसून शोध घेत होते. त्यांच्या शोधार्थ पोलिस पथकेही गठीत करण्यात आली होती. अशातच स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दरोड्यातील फरार आरोपींबाबत माहिती मिळाली. आरोपी नागपूर येथून रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या वणी, पांढरकवडा, यवतमाळ पथकाने शीघ्र नागपूर येथे जाऊन महाराष्ट्राबाहेर पळून जाण्याच्या बेतात असलेल्या तीन आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली.
शुभम सुधाकर कापसे (३०) रा. जामनकर यवतमाळ, विकास दिनेश खुडे (३१) रा. सुरज नगर यवतमाळ, प्रफुल नारायणराव चौकडे (३६) रा. आठवडी बाजार यवतमाळ अशी या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही नागपूर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांना पाहून तिघेही पळत सुटले. मात्र पथकाने त्यांचा पाठलाग करून तिघानाही अटक केली. या धडाकेबाज कार्यवाहीमुळे स्थानिक गुन्हे शाखा पथकाची प्रशंसा केली जात आहे. पथकाने त्यांच्या जवळून दरोड्यात वापरलेले स्कॉर्पियो वाहन (MH १४ DA २७२७) किंमत १२ लाख रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Comments
Post a Comment