रवि नगर येथील व्यक्ती मूल येथील लॉजमध्ये आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत
प्रशांत चंदनखेडे वणी
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील एका लॉजमध्ये वणी शहरातील रवी नगर येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुनिल कृष्णराव देरकर (५२) असे या मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतक हा प्रॉपर्टी डीलर असल्याचे समजते. मंगळवारी तो एका जमिनीच्या व्यवहाराकरिता जातो म्हणून घरून निघाला होता. परंतु आज २९ जूनला त्याचा लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेहच आढळून आला. ही माहिती कुटुंबियांना मिळताच कुटुंबीय तात्काळ मुलला रवाना झाले आहेत. सुनिल देरकर याच्या गळफास घेण्याचे रहस्य मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
शहरातील रवी नगर येथे परिवारासह राहत असलेले सुनिल देरकर हे प्रॉपर्टी डीलर असून ते मूल येथे एका जमिनीच्या व्यवहाराकरिता गेले होते. मंगळवारी ते वणी वरून गेले आणि आज शनिवारी त्यांचा लॉज मधील एका रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच खरं काय ते स्पष्ट होईल. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. सुनिलच्या अशा या अकाली जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment