एलसीबी पथकाने गोवंश जनावरांच्या तस्करीचा डाव उधळला, १२ बैलांची सुटका व २३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल केला जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असतांना पथकाला वणी मार्गे आदिलाबाद येथे गोवंश जनावरांची तस्करी होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वणी मुकुटबन मार्गावरील पेटूर गावाजवळ सापळा रचला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पथकाला वणी कडून एका मागून एक चार पिकअप वाहने सुसाट येतांना दिसली. पथकाने मोठ्या शिताफीने या चारही वाहनांना थांबवून त्यांची झडती घेतली असता या वाहनांमध्ये एकमेकांच्या पायाला बांधून व निर्दयीपणे कोंबून असलेली १२ गोवंश जातीची जनावरे आढळून आली. गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चारही वाहनांवर कार्यवाही करून पथकाने वाहन चालकांना अटक केली आहे. गोवंश जनावरांना तेलंगणा राज्यात कत्तली करीता घेऊन जाणाऱ्या तस्करांचा डाव एलसीबी पथकाने उधळून लावला. त्यांच्या तावडीतून १२ बैलांची सुटका करून घटनास्थळावरून २३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. वणी शहरासह तालुक्यातून गोवंश जनावरांची कत्तली करीता अवैध वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र आता वरोरा, वणी, मुकुटबन मार्गे आदिलाबाद येथे होणाऱ्या गोवंश जनावरांच्या तस्करीचा एलसीबी पथकाने पर्दाफाश केला आहे.
एलसीबी पथकाने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चार पिकअप वाहनांवर कार्यवाही करून त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच चारही वाहन चालकांना अटक केली आहे. यामध्ये अक्षय अनिल करलूके (२८) रा. पुरड (नेरड) ता. वणी (MH २९ BE ६३२४), नितेश रविंद्र किनाके (२२) रा. वंदली ता. वरोरा (MH ३२ AJ ०२३७), निलेश बंडूजी कोल्हे (२८) रा. लोणार ता. समुद्रपूर जि. वर्धा (MH ०७ P ३६६८), सय्यद शाकीर सय्यद महेमूद (३२) चिखलवर्धा ता. घाटंजी जि यवतमाळ (विना क्रमांकाची बुलेरो) यांचा समावेश आहे. या चारही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी सैय्यद खैय्याम सय्यद गफ्फार रा. मुकुटबन ता. झरी याने सांगितल्याप्रमाणे आदिलाबाद येथे गोवंश जनावरांची वाहतूक करीत असल्याचे कबूल केले. एलसीबी पथकाने चारही आरोपींच्या ताब्यातील १२ बैलांची सुटका करून त्यांना श्री गुरु गणेश गौशाला येथे सोडले आहे. गोवंश जनावरांना कत्तली करीता घेऊन जाणाऱ्या पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्था.गु.शा. पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलिस अंमलदार उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागडे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदूरकर, सतिश फुके यांनी केली.
Comments
Post a Comment