अनावश्यक कामांवर निधीची उधळपट्टी, शहरात चांगल्या रस्त्यावर पुन्हा बांधला जात आहे रस्ता
प्रशांत चंदनखेडे वणी
आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता शहरात विकासकामांना उधाण आलं आहे. शहरात विकासकामांचा सपाटाच सुरु झाला आहे. वरचेवर विकासकामे केली जात आहे. जुन्या रस्त्यांवर नवा साज चढविला जात आहे. विकासकामांची गती दाखविण्याकरिता चांगल्या रस्त्यांचेही परत काँक्रीटीकरण केले जात आहे. अनावश्यक कामांवर निधी उधळण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. काही वर्षांपूर्वीच बांधलेल्या व उत्तम स्थतीत असलेल्या सिमेंट रस्त्यावर परत काँक्रेटचा थर चढवून नव्याने बांधकाम करण्यात येत असल्याने अनावश्यक कामांवर निधी उधळण्याचा हा प्रकार आता सर्वांच्याच नजरेसमोर आला आहे. न.प. शाळा क्र. ५ समोरील रस्त्याच्या बांधकामाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. उत्तम स्थितीत असलेल्या या सिमेंट रस्त्याचे परत काँक्रीटीकरण केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावरून निधीचा गैर वापर कशाप्रकारे केला जातो, याचा नागरिकांना साक्षात्कार घडला आहे. शहरातील काही भागात रस्त्यांसाठी ओरड होत असतांना काही भागात मात्र रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याने विकासाचा हा कोणता फार्म्युला आहे, यावर शहरात चर्चा रंगली आहे. तेंव्हा विकासकामांची ही मांदियाळी जनतेच्या निदर्शनास येऊ लागली आहे. विकासकामे करतांना सावत्रपणा दाखविला जात असल्याचेही यावरून उघड झाले आहे. विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला. यात संबंधित सर्वांनीच आपला दीर्घकाळासाठी विकास करून घेतला. पण कामे मात्र अल्पकाळ टिकेल अशीही झाली नाहीत. मुख्य मार्गासह शहरातील अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी आजही केल्या जात आहेत. त्यामुळे विकासकामांच्या प्रवाहाचा ओघ कोणत्या दिशेने वाहिला, ही चर्चा आता शहरात चवीने चघळली जात आहे.
निवडणूका तोंडावर आल्याने शहरात विकासकामांना ज्वर आला आहे. विकासकामांसाठी आलेला निधी खर्च करण्यावर भर दिला जात आहे. परंतु विकासकामे करतांना मात्र सावत्रपणा दाखविला जात आहे. शहरातील काही भागात वरचेवर विकासकामे केली जात आहे. आपल्या काही समर्थकांना खुश करण्याकरिता त्या त्या भागात विकासकामांचा सपाटा लावण्यात आला आहे. तर काही भागात ओरड होऊनही विकासकामे केली जात नाही. मागील अनेक वर्षांपासून जेथे रस्ते व नाल्या बांधण्यात आल्या नाहीत, त्या भागांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. त्यामुळे विकासकामे कुणाच्या इशाऱ्यावरून केली जातात, हा चर्चेचा विषय बनला आहे.
आमदार फंडातून शहराच्या विकासाकरिता १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार नगर पालिकेने शहरातील ११ रस्त्यांच्या बांधकामासाठी निविदा काढल्या आहेत. त्यात १ कोटी ५७ लाख रुपयांची कामे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी नांदेपेरा रोड वरील न.प. शाळा क्र. ५ समोरील (अग्रवाल ते मल्लुरवार यांच्या घरापर्यंत) १६५ मीटर लांब रस्त्याचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता चांगल्या स्थितीत असतांना देखील या रस्त्यावर परत काँक्रीटचा थर चढविण्यात येत आहे. रस्त्यावर रस्ता बांधण्याचा पराक्रम केला जात असल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निधीची होत असलेली उधळण पाहून नागरिकही थक्क झाले आहेत. या रस्त्यावर कुठेही मोठे खड्डे पडलेले नाहीत, की हा रस्ता उखडला नाही. तरीही रस्त्याचे बांधकाम करण्याचं सौजन्य दाखविलं जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा सिमेंट रस्ता सुस्थितीत असतांनाही त्यावर परत काँक्रीटचा थर चढवून त्याचे नाविण्यकरण केले जात आहे. त्यामुळे जनतेचा पैसा कसा उधळला जातो, याचा आता साक्षात्कार होऊ लागला आहे. जेथे आवश्यक आहे तेथे रस्ते बांधले जात नाही, तर जेथे आधी पासून रस्ते आहेत, तेथे रस्त्यावर रस्ते बांधण्यात येत आहे. यावरून कुणाचा साथ आणि कुणाचा विकास केला जात आहे, याची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.
शहरातील अनेक भागात अद्यापही विकासाची गंगा वाहिली नाही. तेथील नागरिकांना आजही रस्ते व नाल्यांच्या बांधकामाची मागणी करावी लागत आहे. विकासकामे करतांना सावत्रपणा दाखविला जात असल्याने नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. नगर पालिका सध्या प्रशासकीय राज अनुभवत आहे. त्यामुळे नगर पालिकेचं कामकाज कुणाच्या इशाऱ्यावर चालते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. नगर पालिकेकडून रस्ते व नाल्यांच्या बांधकामाचा धडाका सुरु आहे. पण प्रभागाचे निरीक्षण करून विकासकामे न करता आंधळेपणाने अनावश्यक ठिकाणी कामे केली जात आहे.
काही वार्डांमधील सताड खुल्या असलेल्या नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घराजवळ साचून राहत आहे. डेंग्यूची ७ ते ८ रुग्ण ज्या वार्डात आढळली, त्या वार्डात भूमिगत नाल्या बांधण्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. २० ते २५ वर्षांपासून काही वार्डात सिमेंट रस्ते बांधण्यात आले नाही. जेंव्हा नागरिक रस्ते व नाल्यांच्या मागण्या घेऊन जातात, तेंव्हा त्यांना तुमच्या वार्डातून मतेच मिळाली नसल्याचे उलट उत्तर देत आल्यापावली माघारी पाठवले जाते. मग हीच काय ती निस्वार्थी विकासाची भाषा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विकसनशील भागाचा कर भरूनही नझूल पट्टेधारकांपेक्षाही वाईट स्थितीत येथील जनतेला वास्तव्य करावं लागत आहे. तेव्हा विकासकामांपासून वंचित राहिलेल्या या वार्डातील रस्ते व नाल्यांची कामे लोकप्रतिनिधींना मतदान केल्याची पावती दिल्यानंतरच होईल काय, असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शाळा क्र. ५ समोरील रस्ता सुस्थितीत असतांनाही या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जात आहे. आणि ज्या वार्डात कामे करण्याची आवश्यकता आहे, तेथे कामे केली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment