अर्ध्यावर डाव मोडला, दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका नामांकित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल १७ जुलैला रात्रीच्या सुमारास घडली. सोनाली दिनेश निमसटकर वय अंदाजे २५ वर्षे रा. मंदर ता. वणी असे या मृतक महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वीच या महिलेचे लग्न झाले होते. तिला मुलबाळ होत नसल्याने ती उपचार घेत असल्याचे सांगण्यात येते. अशातच या दाम्पत्याला गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आल्याने काल १७ जुलैला तिला शहरातील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले. रात्री तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कुटुंबियांच्या आग्रहानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
तालुक्यातील मंदर येथे वास्तव्यास असलेल्या व ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेल्या दिनेश निमसटकर यांचे दोन वर्षांपूर्वी सोनाली हिच्याशी लग्न झाले. लग्नाला दोन वर्षे होऊनही गर्भधारणा होत नसल्याने सोनाली उपचार घेत होती. अशातच या दाम्पत्याला गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. या शस्त्रक्रियेनंतर अपत्य प्राप्ती होईल या आशेने त्यांनी गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी आग्रह धरल्याने मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
जेमतेम संसारिक जीवनाची सुरवात झाली असतांनाच पत्नीचा असा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संसारिक जीवनाची स्वप्ने रंगविलेल्या या दाम्पत्याचा संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला आहे. सहचारिणी अर्ध्यावरच सोडून गेल्याने पतीवर विरहयोग ओढवला आहे. सुखी संसारिक जीवनावर नियतीने घाला घातल्याने स्वप्न रंगविलेल्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. सोनालीवर असा या अकाली मृत्यू ओढावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या अशा या अलगद जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
Comments
Post a Comment