भाजपच्या उमेदवारीचा रस्ता आता व्हाया विजय चोरडिया असा जाणार, विजय चोरडिया यांनी कंबर कसल्याने विद्यमानांची वाट खडतर
प्रशांत चंदनखेडे वणी
विधानसभा निवडणूक अगदीच जवळ आल्याने राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. पक्षांकडून उमेदवारी मिळविण्याकरिता रस्सीखेच सुरु झाली आहे. उमेदवारीसाठी आता दावेदारीही सांगितली जात आहे. राजकारणात मुरलेले व नवखेही उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पक्षांकडून उमेदवारी मिळण्यासाठी दावे प्रतिदावे करण्यात येत असल्याने पक्षश्रेष्ठींसमोरही मोठा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे उमेदवारीवरून कुठे ख़ुशी तर कुठे नाराजीचा सूर उमटणार असून पक्षांतर्गत बंडखोरीचं राजकारण विधानसभा क्षेत्रांमध्ये पाहायला मिळणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रात तर राजकीय हालचालींना अक्षरशः उधाण आले आहे. राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत. एकमेकांवर सरशी साधण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. एवढेच नाही तर उमेदवारी मिळावी म्हणून विविध डावपेच देखील आखले जात आहे. सध्या इच्छुकांच्या दिल्लीच्या वाऱ्या सुरु झाल्या आहेत. आपल्या क्षेत्रात आपलंच वारं असल्याचं पक्षश्रेष्ठींना पटवून दिलं जात आहे. तेंव्हा आता कोणत्या पक्षाचं तिकिट कुणाच्या वाट्याला जाते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. यातच सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे व राजकारणातही सक्रिय असलेले प्रतिष्ठित व्यापारी विजय चोरडिया यांनी देखील विधानसभेसाठी कंबर कसली आहे. भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी मिळण्यासाठी विजय चोरडिया यांनी देखील दावेदारी सिद्ध केल्याने राजकीय क्षेत्र खळबळून निघालं आहे. विजय चोरडिया यांच्या दावेदारीने समीकरणं बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहे. एवढेच नाही तर विद्यमानांचाही विधानसभेचा मार्ग त्यांच्या दावेदारीने खडतर होणार असल्याच्याही चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
व्यवसायिक क्षेत्रात आपल्या स्वभावगुणाने प्रतिष्ठा मिळवणारे विजय चोरडिया हे समाजशील व्यक्तिमत्व म्हणून नावारूपास आले आहेत. तळागाळातल्या लोकांबरोबरच सर्वसामान्य व सर्वच क्षेत्रातील लोकांशी त्यांचा सलोखा राहिला आहे. शब्दांची जपवणूक व प्रेमळवाणी हा त्यांच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्वातील दुवा ठरला आहे. त्यांच्या लोकसमर्पित कार्यांमुळे त्यांची या क्षेत्रात लोकप्रियता वाढली आहे. जनतेतून त्यांना मिळणारा प्रतिसाद त्यांची विधानसभेची वाट सुकर करणारा ठरू शकतो. त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सेवाभावी उपक्रमही त्यांच्या हातून घडले आहेत. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची या क्षेत्रात ख्याती राहिली आहे. धार्मिक कार्यातही त्यांचा नेहमी हातभार लागला आहे. खेळाडूंच्या उज्वल भविष्याकरिता त्यांनी क्रीडाक्षेत्रातही तालुक्याला एक नवी झळाळी दिली आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा माणूस आता सर्वांच्या हक्काचा झाला आहे. आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचं आपल्यावर ऋण असतं, असे म्हणतात. ते ऋण फेडण्याचं सत्कार्य आजही त्याच्या हातून घडत आहे. परिवारातील सदस्यासारखा हा व्यक्ती सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी वाहतो आहे. आंधळ्यांना त्याने दृष्टी तर लुळ्यापांगळ्यांना पायावर उभं केलं आहे. अपंगांची काठी नाही तर त्यांनी अपंगत्वचं दूर केलं आहे. कित्येकांना त्यांनी कृत्रिम अवयव बसवून दिले आहे. गोरगरिबांना मदतीचा हात देऊन त्यांना जगण्याची प्रेरणा देणारा हा व्यक्ती आर्थिक दुर्बल घटकांचा दाता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या हाताने केलेल्या मदतीचा त्या हातालाही पता लागू नये, अशी तर कित्येक कार्य विजय चोरडिया यांच्या हातून घडली आहेत.
जनहितकार्याची तळमळ असलेले विजय चोरडिया आता वणी विधासभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात सर्व सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता त्यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून त्यांनी बऱ्याच राजकीय उपक्रमांना हात घातला आहे. पक्ष कार्यात ते नेहमी सक्रिय राहिले आहेत. पक्षाचं त्यांनी इमाने इतबारे कार्य केलं आहे. आता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखविण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास वणी विधासभा गाजवीण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. ३५ वर्षांपासून समाजकार्याची धुरा वाहणारे विजय चोरडिया हे २० वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. मानवी हक्कासाठी त्यांनी आंदोलने देखील उभारली आहेत. कामगारांच्या प्रश्नांना घेऊन त्यांनी आवाज उठविला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा येऊ नये म्हणून त्यांनी नेहमी मदतीचा हात पुढे केला आहे. या त्यांच्या सर्वसमावेशक कार्यांची दखल घेऊन त्यांना पक्षाने उमेदवारी बहाल करावी, ही अपेक्षा बाळगून ते कामाला लागले आहेत. मात्र विजय चोरडिया यांच्या दावेदारीने राजकीय समीकरणं बदलणार, ही चर्चा रंगू लागली आहे. विजय चोरडिया यांनी वणी विधानसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी मागितल्याने विद्यमानांची विधासभेची वाट खडतर दिसत आहे.
Comments
Post a Comment