तालुक्यात अतिवृष्टी, २६४ हेक्टर शेती प्रभावित, पाच गावांचा तुटला संपर्क
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरासह तालुक्यात मागील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधार पावसामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. वर्धा व निर्गुडा या दोन प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नालेही तुडुंब भरले आहेत. १९ जुलैच्या सायंकाळ पासून शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. वणीसह तालुक्यातील आठ मंडळात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे कठीण झाले आहे. पावसामुळे शेतातील कामेही खोळंबली आहेत. उशिरा पेरणी झालेल्या शेतातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अतिवृष्टीमुळे २६४ हेक्टर शेती प्रभावित झाल्याची माहिती मिळाली असून निर्गुडा नदीला आलेल्या पुरामुळे पाच गावांचा संपर्क तुटला आहे. शहरासह तालुक्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची रीप रीप सुरुच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. १९ जुलैला सायंकाळपासून सुरु झालेला पाऊस अजूनही धो-धो बरसत आहे. तीव्र स्वरूपाच्या जलधारा कोसळत असल्याने नागरिकांचे घराबाहेर पडणे देखील कठीण होऊन बसले आहे. यातच नागरिकांची अनेक महत्वाची कामेही रखडली आहेत. ऑनलाईन कामांनाही सतत सुरु असलेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. शासकीय योजनांच्या कामातही पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे. पावसामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचीही मोठी तारांबळ उडतांना दिसत आहे. दिवसरात्र पावसाचा कहर सुरु असल्याने छोट्या व्यवसायिकांवर आपले व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शेतात तळे साचल्याने कास्तकारही चिंतेत आला आहे. शेत पिकांना अतिवृष्टीचा फटका बसू नये, ही काळजी आता शेतकऱ्यांना लागली आहे.
अतिवृष्टीमुळे २६४ हेक्टर शेती प्रभावित झाली असून शेत पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. वणी उपविभागातील ९ मंडळांपैकी वणी, राजूर, भालर, पुनवट, शिरपूर, गणेशपूर या मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या मंडळांमध्ये घरांची पडझड झाल्याचीही माहिती मिळाली आहे. सहा घरांची पडझड झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. नदी नाल्यांनीही धोक्याची पाताळी गाठली असून निर्गुडा नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने शेलू (बु.), सावंगी(नविन), चिंचोली, कवडशी, शिवणी(ज.) या गावांचा संपर्क तुटला आहे. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तर नालेही तुडुंब भरले आहेत. तालुक्यातील आठही मंडळात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. आज तालुक्यात ६४.८ मि.मि. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. नदी काठावरील सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यात सतत सुरु असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Comments
Post a Comment