सरपंच वर्षा मडावी यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीने धरली विकासाची कास, आठ महिन्यात झाली लाखो रुपयांची विकासकामे

 
प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विरकुंड ग्राम पंचायतीने विकासाची कास धरली असून गावातील विकासकामे करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायतीत सत्ता बदल झाल्यानंतर विकासकामांना गती आली आहे. गावांमध्ये विकासकामांचा धडाकाच सुरु झाल्याने गाववासीयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. माजी सरपंच कविता सोयाम यांच्या विरुद्ध ग्रा.प. सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केल्यानंतर वर्षा मडावी यांची सरपंच पदी वर्णी लागली. वर्षा मडावी यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच विकासकामांचा सपाटा लावला आहे. त्यांनी विकासकामांकरिता निधी खेचून आणल्याने गावात विकासकामांची गंगा वाहिली आहे. पाच गावांमिळून विरकुंड ही गट ग्रामपंचायत आहे. या पाचही गावातील विकासकामांना वर्षा मडावी यांनी हात घातल्याने गावांचा कायापालट होऊ लागला आहे. गावांमध्ये ठिकठिकाणी सिमेंट रस्ते व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असून गावात स्वछता ठेवण्यावरही भर दिला जात आहे. अंगणवाडीकरिताही सर्व नविन साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. कचरा संकलनाकरिता घंटा गाडी खरेदी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीला मिळालेला निधी गावाच्या विकासावर व गावात सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता खर्च केला जात आहे. 

विरकुंड गट ग्रामपंचाती अंतर्गत येणारी गावे विकासापासून कोसो दूर राहिली होती. गावात धड रस्ते व नाल्याही नव्हत्या. गावात सोयीचे रस्ते नसल्याने गावकऱ्यांना जाणे येणे करतांना मोठ्या अडचणी निर्माण व्हायच्या. पावसाळ्यात चिखल तुडवीत जाणे येणे करावे लागत होते. दुचाकी चालवितांना तर तारेवरची कसरत करावी लागायची. नाल्या नसल्याने सांडपाणी उघड्यावर फेकल्या जायचे. जाण्यायेण्याच्या रस्त्यांवरून घाणपाणी वाहतांना दिसायचे. सोइ सुविधांचा गावात पूर्णतः अभाव होता. स्मशानभूमीकडे जाण्याकरिताही रस्ता नव्हता. मृत्यू नंतरही अंत्यसंस्काराची वाट खडतर होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष खदखदत होता. अशातच २५ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी तत्कालीन सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव पारित केला. त्यानंतर सरपंच पदाची सूत्रे वर्षा मडावी यांच्याकडे आली. त्यांनी सदस्यांना विश्वासात घेऊन विकासकामांवर लक्ष केंद्रित केले. विकासकामांसाठी त्यांनी निधी खेचून आणला. आणि अवघ्या आठ महिन्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकासकामांची भरभराट आणली. 

गावातील खडतर वाटा आता गुळगुळीत रस्त्यांत रूपांतरित झाल्या आहेत. सांडपाणी वाहून नेण्याकरिता काँक्रीट नाल्या बांधण्यात आल्या आहेत. घराघरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो आहे. गावातही स्वछता ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कचरा संकलनाकरिता घंटा गाडी खरेदी करण्यात आली आहे. अंगणवाडीतील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याकरिता हरसंभव प्रयत्न केले जात आहे. अंगणवाडीला नवीन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. गावकऱ्यांना सर्व सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वर्षा मडावी यांची सतत धडपड सुरु आहे. गावकऱ्यांना ग्रामपंचायती कडून कुठलेही दाखले मिळण्यात कोणत्याही अडचणी येणार नाही, याचीही सर्वोतपरी काळजी घेतली जाते. त्यामुळे वर्षा मडावी सरपंच झाल्यापासून गावात होऊ लागलेला विकास पाहून गावकरीही भारावून गेले आहेत. गावांमध्ये होत असलेली कामे पाहून गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होतांना दिसत आहे. 

वर्षा मडावी यांच्या बाजूने सहा सदस्य उभे राहिले व त्यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर वर्षा मडावी यांनी मागे वळून पहिले नाही. त्यांनी गावाच्या विकासाचा ध्यास घेतला. गावातील विकासकामांकरिता निधी खेचून आणण्यावर त्यांनी जोर दिला. त्यांनी तत्परता दाखविल्याने ग्रामपंचायतीला भरभरून निधी मिळाला. मनरेगाचीही कामे त्यांनी खेचून आणली. त्यांची गावाच्या विकासाप्रती असलेली धडपड पाहून आमदारांनीही निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी आपल्या अल्प कार्यकाळातच डोंगरगाव स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता, नवेगाव येथील कोलाम पोड ते स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता, विरकुंड येथील मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता, विठ्ठलनगर येथिल अनंता पारखी यांच्या घरापासून तर हनुमान मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता आणि नाली, नवेगाव येथील जी.प. शाळेपासून देरकर यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता (खडीकरण), विरकुंड येथील विनोद मडावी यांच्या घरापासून तर गुरुदास थेरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता अशी लाखो रुपयांची विकासकामे केली. 

दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने विकासकामांकरिता निधी मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे प्रस्तावित विकासकामे थांबली आहेत. ती देखील आता लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच पंधराव्या वित्त आयोगातूनही गावांमध्ये आणखी विकासकामे होणार असून या कामांचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. वर्षा मडावी यांनी गावाच्या विकासाचा केलेला संकल्प पूर्ण केला असून त्यांना उपसरपंच पिनू डांगे व ग्रामपंचायत सदस्य अमोल पारखी, भूपेंद्र पावडे, सतिश राजूरकर, लता हिंगणे, चंपत आत्राम यांची देखील मोलाची साथ लाभली आहे. त्यांनी गावातील विकासाची लाट अशीच कायम राहणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वर्षा मडावी यांनी विरकुंड गट ग्रामपंचाती अंतर्गत येणाऱ्या गावांच्या साधलेल्या विकासामुळे गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होतांना दिसत आहे. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी