नाला पार करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले, शेवटी शेतकऱ्याचा मृतदेहच आढळला
प्रशांत चंदनखेडे वणी
मागील सात ते आठ दिवसांपासून वणी व मारेगाव तालुक्यात सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. तर नाल्यांना पूर आल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. नाल्यावरील पुलांवरून पाणी वाहू लागल्याने काही गावांचा जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच शेत शिवारातील नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे कठीण झाले आहे. अशातच प्रचंड प्रवाह असलेला नाला पार करून जाणे एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतले आहे. शेताकडे जाण्याच्या मार्गात असलेला नाला पार करतांना पाण्याच्या प्रवाहात शेतकरी वाहून गेल्याची खळबळजनक घटना २९ जुलैला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. मारेगावचे तहसीलदार निलावाड यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. मेघश्याम नारायण वासाडे (५८) रा. चिचमंडळ ता. मारेगाव असे या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मेघश्याम वासाडे हा शेतकरी जनावरे घेऊन शेतात जाण्याकरिता निघाला. दापोरा फाट्याजवळ असलेल्या उपश्या पुलाच्या खालून शिवपांदन रस्त्याने नाला पार करतांना नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने शेतकरी हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. जनावरे नाला पार करून आली पण शेतकरी न आल्याचे पाहून इतर शेतकरी व गावकऱ्यांनी त्यांचा शोधाशोध सुरु केला. नाल्यात त्यांचा शोध घेत असतांना काही अंतरावरच त्यांचा मृतदेह आढळून आला. नाल्याला आलेल्या पुरातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात त्यांचा नाहक बळी गेला. तालुक्यात सात ते आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने गावाशेजारील नाल्यांना प्रचंड पूर आला आहे. शेतकरी शेतात जाण्याकरिता तुडुंब भरून वाहत असलेले नाले ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यातच पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहे. मेघश्याम वासाडे यांच्या अशा या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. मारेगाव तहसीलदारांनी घटनास्थळाला भेट दिली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment