वणीच्या प्रवाशांना वरोरा टप्प्यावरून चढण्याउतरण्याची परवानगी देण्याची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
नागपूर व चंद्रपूर वरून वरोरा मार्गे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वरोरा बसस्थानकावर न जाता टप्प्यावरून (रत्नमाला चौक) जात असल्याने वणी येथील प्रवाशांना प्रवास करतांना चांगल्याच अडचणी येत आहे. नागपूर वरून चंद्रपूर जाणाऱ्या बसेस वरोरा बसस्थानकावर जात नसल्याने वणीच्या प्रवाशांना टप्प्यावर उतरावे लागते. मात्र चंद्रपूर वरून वणीला जाणाऱ्या बसेस टप्प्यावरून प्रवाशांना घेत नसल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. प्रवाशांना बसस्थानकावर येण्याकरिता ऑटोचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे वरोरा टप्प्याला जुने बसस्थानक घोषित करून वणीला जाणाऱ्या प्रवाशांना तेथून बसमध्ये घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वणी येथील नागरिकांनी एसटी महामंडळाच्या नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ विभागीय नियंत्रकांना निवेदनातून केली आहे.
चंद्रपूर वरून नागपूर व नागपूर वरून चंद्रपूर जाणाऱ्या बसेस वरोरा बसस्थानकावर न जाता वरोरा टप्प्यावरूनच जात असल्याने वणीच्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. टप्प्यावरून प्रवाशांना वरोरा बसस्थानकावर येण्याकरिता ऑटोचा नाहक खर्च उचलावा लागत आहे. चंद्रपूर वरून वणीला जाणाऱ्या बसेस टप्प्यावरून प्रवाशांना घेत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव आर्थिक भुर्दंड सोसून ऑटोने बसस्थानक गाठावे लागते. वणी वरून नागपूर, वर्धा, पुलगाव जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र या मार्गावरील बसच्या फेऱ्या अतिशय कमी असल्याने प्रवाशांना नेहमीच वरोरा पर्यंत जावे लागते. परंतु वरोरा बसस्थानकावरून नागपूर व वर्धा जाणाऱ्या बसेस मिळत नाही. त्याकरिता प्रवाशांना वरोरा टप्प्यावर जावे लागते. त्यामुळे वणी येथील प्रवाशांना चांगल्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना वरोरा बसस्थानकावरून टप्य्यावर जाण्याकरिता नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. हीच परिस्थिती नागपूर चंद्रपूर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वरोरा टप्प्यावर उतरल्यानंतरही उद्भवते. त्यामुळे वरोरा टप्प्याला जुने बसस्थानक घोषित करून वणीच्या प्रवाशांना तेथून चढण्या उतरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. किंवा प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी. वरोरा टप्प्यावरून काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून बसस्थानकावर येतात. जीव धोक्यात घालून त्यांना वरोरा बसस्थानकावर यावे लागते. तेंव्हा एसटी महामंडळाने वणीच्या प्रवाशांना वरोरा टप्प्यावरूनच बसमध्ये चढण्या उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देत तशी त्या त्या आगाराच्या बसेसना परवानगी देण्याची मागणी वणी येथील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. तसे त्यांनी एसटी महामंडळाच्या नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ आगाराच्या विभागीय नियंत्रकांना निवेदनही दिले आहे.
निवेदनावर मंगल तेलंग, बंडू गणवीर, प्रशांत गाडगे, संदीप दुपारे, गौरव जवादे, दीपक गोहणे, प्रवीण उपरे, आकाश बोरकर, शशिकांत नक्षीने, अविनाश नक्षीने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment