डीबी पथकाला गवसली दुचाकी चोरट्यांची टोळी, पाच दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
प्रशांत चंदनखेडे वणी
ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी दुचाकी चोरट्यांचा ठाव ठिकाणा शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिल्याने डीबी पथक दुचाकी चोरट्यांचा कसून शोध घेत होते. अशातच त्यांना खबऱ्यांकडून दुचाकी चोरट्यांबाबत माहिती मिळाली. डीबी पथकाने तेलंगणा राज्य, वर्धा जिल्हा व चंद्रपूर जिल्ह्यातून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. १२ जुलैला शुभम सुभाष मांडवधरे (२५) रा. सुकळी ता. बाभुळगाव यांनी त्यांची दीपक चौपाटी परिसरातून दुचाकी (MH २९ BG ८३४६) चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास डीबी पथकाकडे देण्यात आला. डीबी पथकाने शोध मोहीम राबवून तसेच सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन तेलंगणा राज्यातून शेख शादाब शेख हबीब व मुजाहिद नजीम नासिर अहेमद यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नाही तर पोलिस तपासात त्यांनी अमरावती येथूनही दुचाकी (MH ४० BB ०१२२) चोरी केल्याचे उघड झाले आहे. डीबी पथकाने त्यांच्या जवळून MH २९ BG ८३४६ ही हिरो स्प्लेंडर कंपनीची दुचाकी जप्त केली आहे.
दुचाकी चोरीची दुसरी तक्रार १३ जुलैला पोलिस स्टेशनला प्राप्त झाली. या प्रकरणीही डीबी पथकाने खबऱ्यांच्या मदतीने दुचाकी चोरट्यांचा ठावठिकाणा शोधून वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातून त्यांना अटक केली आहे. धनंजय किसन गोवऱदीपे रा. आनंद नगर वणी यांच्या तक्रारी नुसार त्यांची दुचाकी (MH २९ BQ १०७७) ही टिळक चौकातून चोरीला गेली होती. डीबी पथकाने या चोरी प्रकरणाचाही छडा लावून वर्धा जिल्ह्यातून पवन पोहनकर व चंद्रपूर जिल्ह्यातून दीपक शंकर मेश्राम या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या जवळून MH २९ BQ १०७७ ही हिरो पॅशन कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे २९ मे ला चोरी गेलेली मोटारसायकलही पोलिसांनी हुडकून काढली आहे. दुचाकी चोरट्याला पारधी बेडा धोपटाळा जि चंद्रपूर येथून अटक करण्यात आली आहे. केसुर्ली ता. वणी येथील रहिवाशी असलेल्या अभिमन्यू तात्याजी गोहणे (४५) यांची दुचाकी (MH २९ J १८७९) जटाशंकर चौकातील बँक ऑफ इंडिया समोरून चोरी गेली होती. या दुचाकी चोरट्यालाही डीबी पथकाने अटक केली आहे. प्रदीप उर्फ तात्या संजय शेरखुरे या आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातून डीबी पथकाने अटक केली आहे. दुचाकी चोरट्यांची शोध मोहीम राबवून डीबी पथकाने दुचाकी चोरट्यांची टोळीच जेरबंद केली आहे. या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलिस कोठडी मिळविण्यात आली आहे. त्यांच्या कडून आणखी दुचाकी चोऱरीच्या घटना उघड करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख बलराम झाडोकर, डीबी पथकाचे विकास धडसे, पंकज उंबरकर, मो. वसिम, शाम राठोड, विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली केली. दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणाचा तपास स.फौ. सुरेंद्र टोंगे, पोहेकॉ सिमा राठोड, पोकॉ आकाश अवचारे, विजय गुजर हे करीत आहे.
Comments
Post a Comment