रात्री झोपेत विषारी सापाचा बापलेकांना दंश, चिमुकला दगावला तर वडिल देत आहे मृत्यूशी झुंज
प्रशांत चंदनखेडे वणी
रात्री झोपेत विषारी सापाने दंश केल्याने १६ महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील अत्यवस्थ असल्याची घटना २३ जुलैला मध्यरात्री शास्त्री नगर येथे घडली. दक्षित सुमित नेलावार असे या सर्प दंशाने मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. तर वडील सुमित नेलावार (३४) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
शास्त्री नगर परिसरातील मोक्षधाम जवळ कुडाच्या घरात परिवारासह राहत असलेले सुमित नेलावार हे मजुरी करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात.. रात्री नेहमी प्रमाणे ते परिवारासह घरात झोपले असतांना नजर चुकवून घरात शिरलेल्या विषारी सापाने बापलेकांना दंश केला. आधी या विषारी सापाने चिमुकल्याला चावा घेतला. रात्री २ वाजता अचानक मुलगा जोरजोरात रडायला लागल्याने वडील त्याला कुशीत घेऊन झोपविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच वडिलांनाही सापाने दंश केला. सुमित यांना सापाने दंश केल्यानंतर त्यांना मुलालाही साप चावला असावा असा दाट संशय आला. त्यामुळे त्यांनी लगेच पत्नीला झोपेतून उठवून दक्षित व मला सापाने चावा घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पत्नीने क्षणाचीही विलंब न करता शेजाऱ्यांच्या मदतीने पती व चिमुकल्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयीन डॉक्टरांनी चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यांना चंद्रपूर येथे हलविले जात असतांनाच वाटेत चिमुकल्याचा श्वास थांबला. तर वडिलांची रुग्णलयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेने सुमितच्या पत्नीला जबर धक्का बसला आहे. तिच्या काळजाचा तुकडा कायमचा हिरावला गेला. तर पतीचा मृत्यूशी संघर्ष सुरु असल्याने तिला दुःखं अनावर झालं आहे. पती, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा हा परिवार. नियतीने डाव साधला व क्षणात होत्याचे नव्हते झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विषारी साप हा अंथरुणातच असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी मध्यरात्रीच सर्प मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी मोठ्या शिताफीने सापाला रेस्क्यू केले. विषारी साप हा मण्यार जातीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयात नेहमीच गंभीर आजारावरील लसींचा तुटवडा असतो. रेबीजची लस देखील कधी कधी उपलब्ध नसते. सर्प दंश केलेल्या रुग्णांना तर नेहमीच रेफर केल्या जाते. सर्प दंशावर कुठल्याही प्राकाराचा उपचार याठिकाणी उपलब्ध नाही. अशा रुग्णांना सरळ रेफर केले जात असल्याने त्यांना तातडीने उपचार मिळत नाही. त्यामुळे विषारी साप लावलेले रुग्ण दगावण्याच्या घटना वाढत आहेत. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नसल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तालुक्याला अजूनही उपजिल्हा रुग्णालय मिळाले नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा केवळ राजकीय स्टंट बनल्याच्या खुल्या चर्चा आता नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.
Comments
Post a Comment