गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगणाऱ्या राजूर (कॉ.) येथील तरुणाला अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
गुंड प्रवृत्तीचे युवक आता घातक शस्त्र जवळ बाळगू लागल्याने कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहशतीचे वातावरण निर्माण करण्याकरिता या अपप्रवृतीच्या युवकांकडून अवैधरित्या शस्त्र खरेदी केले जात आहे. गुन्हेगारी जगतात आपले वर्चस्व निर्माण करण्याकरिता युवकांकडून अपराधीक घडामोडी घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वणी शहरालगत असलेल्या राजूर (कॉ.) येथील तरुणाला अग्निशस्त्र व जिवंत काडतुसासह चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या जवळून गावठी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतूस यासह एक आलिशान कार असा एकूण २ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मो. जमील अयनुल हक शेख (मौला) (२२) रा. राजूर (कॉ.) असे या अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींचा शोध घेत असतांनाच त्यांना राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा ता. भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील पुलाखाली एक तरुण एका आलिशान कारमध्ये देशी पिस्टल जवळ बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पाटाळा पुलाजवळ येऊन पाहणी केली असता त्यांना तेथे कथ्या रंगाची होंडा सिटी कार आढळून आली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने कारला घेराव घालून कारमधील तरुणाला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता पथकाला पांढऱ्या रंगाच्या थैलीमध्ये एक गावठी पिस्टल व जिवंत काडतूस आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पिस्टल व काडतूस जप्त करून सदर तरुणाला अटक केली. मो. जमील अयनुल हक शेख रा. राजूर (कॉ.) ता. वणी जि. यवतमाळ असे त्याने आपले नाव सांगितले. आरोपीचे क्राईम रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याच्या जवळून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एक गावठी पिस्टल किंमत २५ हजार रुपये, एक जिवंत काडतूस किंमत ५०० रुपये व होंडा सिटी कार (MH ०२ AL ८०५२) किंमत २ लाख रुपये असा एकूण २ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मो. जमील याच्या विरुद्ध नुकतीच वणी पोलिस स्टेशनमध्ये एका तरुणाने त्याची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली आहे. याचा तपास सपोनि दत्ता पेंडकर हे करीत होते. मात्र त्यांची बदली झाल्याने नवनियुक्त पीएसआयकडे तपास सोपविण्यात आला आहे.
सदर कार्यवाही चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्था.गु. पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि विनोद भुरले, पोहवा गजानन नागरे, अजय बागेसर, सतिश अवथरे, पोलिस शिपाई प्रशांत नागोसे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथकाने केली.
Comments
Post a Comment