लो. टि. महाविद्यालयाचा संस्कृत सप्ताह संपन्न
प्रशांत चंदनखेडे वणी
शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय संस्कृत विभाग तथा संस्कृत भारती शाखा वणीच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने संस्कृत सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात संस्कृत भारती द्वारा प्रकाशित "संस्कृतं वदतु" या पुस्तकाचे ५० घरांना निःशुल्क वाटप करण्यात आले. महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या निवडक विद्यार्थिनींनी ५० घरांशी संपर्क साधून या पुस्काचे वाटप केले.
हे पुस्तक दैनंदिन जीवनासाठी अतिशय उपयोगी असून या वैष्ट्यपूर्ण पुस्तकात रोजच्या जीवनाशी निगडित अनेक महत्वपूर्ण संस्कृत वाक्ये आहेत. तसेच वेगवेगळ्या पदार्थांना व वस्तूंना असणारी संस्कृत नावे, संस्कृतमध्ये वेळ सांगण्याची पद्धत, विविध व्यवसायात आवश्यक संस्कृत वाक्ये अशा अनेक महत्वपूर्ण बाबी या पुस्तकात आहेत. अशा स्वरूपातील माहितीच्या आधारे सात दिवसांत एकूण ५० प्रश्नांच्या सात प्रश्न मालिका त्या सर्व घरांमध्ये वितरित करून त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेण्यात आल्या.
लोकमान्य टिळक महाविद्यालय संस्कृत विभाग प्रमुख तथा संस्कृत भारती शाखा वणीचे अध्यक्ष प्रा. स्वानंद पुंड यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या अभिनव उपक्रमात छकुली मांदाडे, प्राजक्ता धांदे, श्रद्धा वानखेडे, दीपाली कांबळे, दुर्गा बनसुले, ज्योत्स्ना शेडामे, साक्षी म्हसे, साक्षी सोनेकर, सम्यक तामगाडगे, ईशा पारशिवे, तनिषा सहारे, योग्यश्री वाढनकर, प्रतीक्षा जोशी या विद्यार्थिनींनी विचारलेले सर्व प्रश्न सम्यक तमागाडगे या विद्यार्थिनीनेच तयार केले होते, हे विशेष.
या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी आम्हाला या निमित्ताने संस्कृतमधील अनेक गोष्टी प्रथमच समजून घेता आल्या अशा प्रतिक्रिया व्यक्त करतांनाच ही भाषा खूप कठीण आहे, अशी आमची पूर्वग्रह भूमिका थोडी दूर झाली असे मत मांडले. तसेच संस्कृत भाषेतील अनेक गोष्टी समजुन घेण्यास आम्हाला आनंदच वाटेल असेही त्यांनी या भाषेबद्दल बोलतांना सांगितले. अशा या प्रथमच साकारलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे लो. टि. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी विशेष कौतुक केले.
Comments
Post a Comment