व्यावसायिकाला भर रस्त्यात लुटणाऱ्या सहा लुटारूंना अवघ्या तीन दिवसांत अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील वसंत गंगा विहार येथील बालाजी अपार्टमेंट समोर राहणाऱ्या एका व्यावसायिकाला गंगा विहार गेट जवळ अडवून चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या सहा लुटारूंना पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत अटक केली आहे. गणेश दत्ता चौगुले (२४), शेख सलीम शेख हुसैन (२६) दोन्ही रा. वार्ड क्रमांक ७ मारेगाव जि.यवतमाळ, रीतिक गणेश तोडसाम (२४), पियूष अरुण नारनवरे (१९) दोन्ही रा.इतवारा बाजार, पोलिस चौकी जवळ वर्धा, तौसिफ रज्जाक कुरेशी (२५) रा. आनंद नगर, रेल्वे लाईनच्या बाजूला वर्धा, सूजल सुरेश पाटील (१९) रा.इतवारा बजार वर्धा अशी पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. दोन आरोपींना मारेगाव येथून, दोन आरोपींना वर्धा येथून तर दोघांना चिखलदरा येथून मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली. त्यांच्या जवळून ३ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

शहरातील प्रसिद्ध अंकुश मोबाईल शॉपीचे संचालक अंकुश चिंतामणी बोढे (३६) हे १९ ऑगस्टला रात्री ९.१५ वाजता नेहमी प्रमाणे दुकान बंद करून वसंत गंगा विहार येथील आपल्या घराकडे जात असताना त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या दरोडेखोरांनी त्यांना रस्त्यात गाठले. गंगा विहार गेट जवळ दरोडेखोरांनी त्यांच्या दुचाकी समोर कार आडवी केली. यावेळी अंकुश यांचा साळा दुचाकी चालवित होता. तर अंकुश हे मागे बसले होते. कार मधून एक तरुण खाली उतरला व अंकुश यांच्या जवळ आला. नंतर कार मधून आणखी दोघे जण खाली उतरले. दुचाकीला आडवी झालेली कार व कार मधून बाहेर आलेले तरुण त्यांच्याकडे येतांना पाहून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यातच अंकुश यांच्या जवळ 6 लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी होती. त्यामुळे ते दुचाकीवरून उतरून पळत सुटले. मात्र दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. एकाने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावली. एवढेच नाही तर अंकुश यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची चैन देखील लुटारूंनी ताकदीने ओढली. परंतु अर्धी सोन्याची चैन तुटून खाली पडली, व अर्धी चोरट्यांच्या हाती लागली. तीन आरोपींनी रोख रक्कम व सोन्याची चैन हिसकावली, तर एक आरोपी कारमध्येच बसून होता. व्यावसायिकाजवळील मुद्देमाल लुटल्यानंतर चौघांनीही कार मधून पळ काढला 

अचानक घडलेल्या दरोड्याच्या घटनेने अंकुश हे कमालीचे भयभीत झाले. त्यांनी लगेच आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. नंतर घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगण्यात आला. पोलिसांनी वेगवान हालचाली करीत शहरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात एक निळ्या रंगाची कार आंबेडकर चौकाकडे भरधाव जातांना आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करून इतरही सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. तसेच खबऱ्यांना देखील अलर्ट करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलेले दोन दरोडेखोर हे मारेगाव येथील रहिवाशी असल्याची गोपनीय माहिती एलसिबी पथकाला मिळाली. पथकाने तात्काळ मारेगाव येथून दोन आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. आणि आपल्या इतर साथीदारांचे नाव व पतेही सांगितले. या प्रकरणावर जातीने लक्ष घालून असलेल्या एसडीपिओ गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी एलसीबीची दोन व पोलिसांची तीन पथकं तयार करून आरोपींच्या शोधार्थ पाठविली. एलसीबी व पोलीस पथकाने वर्धा व चिखलदरा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. १९ ऑगस्टला दरोड्याची घटना घडल्या नंतर शीघ्र तपासचक्रे फिरवून पोलिसांनी २० ऑगस्टला दोघांना तर २१ व २२ ऑगस्टला चार जण अशा सहाही आरोपींना अवघ्या तीन दिवसांत अटक केली. त्यांच्या जवळून लुटलेल्या मुद्देमालापैकी ३ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या लुटारूंनी ६ लाख रुपये राख रक्कम व सोन्याची चैन असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या सहाही दरोडेखोरांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 309(4), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, एसडीपिओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.पो.नी. ज्ञानोबा देवकाते, ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोउपनि धिरज गुल्हाने, पोहेकॉ. विकास धडसे, गजानन डोंगरे, पोना पंकज उंबरकर, पोकॉ विशाल गेडाम, श्याम राठोड, मो. वसीम, गजानन कुडमेथे, शंकर चौधरी, एसडीपीओ कार्यालयातील पोहेकॉ इकबाल शेख, विजय वानखेडे, पोकॉ संतोष कालवेलवार, अमोल मुन्नेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकार, मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ, पोउपनि प्रमोद जिड्डेवार, पोहेकॉ आनंद अलचेवार, अफजल पठाण, नापोकॉ अजय वाभीटकर, शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अजयकुमार वाढवे, धनंजय हाके, पोहेकॉ उल्हास कुरकुटे, योगेश डगवार, सुनिल खंडागडे, सुधिर पांडे तथा एलसिबी पथक व डीबी पथकाने केली.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी