सरपंच परिषदेच्या मुंबई येथील धरणे आंदोलनात वणीचे कार्याध्यक्ष राजू इद्दे कडाडले
प्रशांत चंदनखेडे वणी
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामपंचायत कर्मचारी, परिचालक व ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन आझाद मैदान मुंबई येथे २८ ऑगस्टला एक दिवसीय धरणे आंदोलन केले. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषद वणीचे कार्याध्यक्ष राजू इद्दे यांनी आपल्या भाषणातून शासनावर तोफ डागली. सरपंचाच्या मागण्यांना शासन गांभीर्याने घेत नसल्याची टीका करतांनाच त्यांनी मागण्या मान्य होईस्तोर हा लढा असाच सुरु ठेवावा लागणार असल्याची उपस्थितांसमोर डरकाळी फोडली. या धरणे आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने सरपंच उपस्थित झाले होते. आंदोलन स्थळाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते नाना पडोळे, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी आवर्जून भेट दिली.
या धरणे आंदोलनातून राजू इद्दे यांनी तीव्र शब्दांत सरपंचांच्या व्यथा मांडल्या. शासन सरपंचांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी शासनाच्या धोरणावर सडकून टीका केली. ग्रामपंचायत सरपंच हा गावचा प्रमुख असतांना देखील त्याला गावगाड्याचे प्रश्न व समस्या सोडविण्याकरिता निधीची प्रतीक्षा करावी लागते. आमदार, खासदारांप्रमाणे सरपंचांना ग्रामपंचायत स्थानिक विकास निधी मिळत नाही. सरपंच, उपसरपंच व सदस्यांना भरीव मानधन मिळत नाही. १५ लाख रुपयांपर्यंतची विकासकामे करण्याचा अधिकार शासनाने वटहुकूम काढून सरपंचांना देण्याची तरतूद अद्यापही करण्यात आलेली नाही. शासन सरपंचांना अधिकार बहाल करायला तयार नाही. मागील अनेक दिवसांपासून अखिल भारतीय सरपंच परिषद सरपंचांच्या मागण्यांबाबत आग्रही आहे. मात्र शासन परिषदेच्या मागण्या गांभीर्याने घेतांना दिसत नाही. त्यामुळे अखिल भारतीय सरपंच परिषदेने ठरल्या प्रमाणे मुंबई येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजू इद्दे यांनी आक्रमकपणे सरपंचांच्या व्यथा मांडल्या. या धरणे आंदोलनात वणी येथून सरपंच परिषदचे अध्यक्ष तुकाराम माथनकर, राजू इद्दे, हेमंत गौरकार, निलेश पिंपळकर, प्रविण झाडे, अजय कौरासे यांच्यासह अनेक गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment