शांतता समितीच्या सभेत सदस्यांनी मांडल्या विविध लक्षवेधी सूचना, शहरातील समस्यांकडे वेधले लक्ष
प्रशांत चंदनखेडे वणी
आगामी सण उत्सवाचा काळ लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सण उत्सव शांततेत पार पडावे म्हणून पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सण उत्सवाच्या काळात सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्याची पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. त्यानुषंगाने पोलिसांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सण उत्सव एकोप्याने साजरे व्हावे याकरिता गुरवार दि. २९ ऑगस्टला सायंकाळी पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची सभा घेण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पोलिस प्रशासनाकडून शांतता समितीच्या सर्व सदस्यांना आमंत्रित करून सण उत्सव साजरे करतांना येणाऱ्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी शांतता समितीच्या बैठकीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. शांतता समितीच्या या सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी, वाहतूक उपशाखा प्रमुख एपीआय सिता वाघमारे, सा. बा. विभागाचे उपविभागीय अभियंता सुहास ओचावार, न. प. उप मुख्याधिकारी जयंत सोनटक्के तथा महावितरणचे अभियंता व इतरही अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शांतता समितीची ही सभा वादळी झाली. शांतता समितीच्या सदस्यांनी व सुज्ञ नागरिकांनी महावितरणच्या गलथान कारभारावर आपला रोष व्यक्त केला. महावितरणच्या अभियंत्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. तसेच वाहतूक व्यवस्थेवरही उपस्थितांनी आपली नाराजी व्यक्त केली. ऑटो चालक सर्रास नियमांचं उल्लंघन करीत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. शहरात ऑटो चालकांची मनमानी सुरु असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सदस्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. तसेच अनेक लक्षवेधी सूचना शांतता समितीच्या सदस्यांनी या सभेतून मांडल्या.
पोळा, गणेश उत्सव, ईद -ए-मिलाद तथा आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची सभा पार पडली. या सभेत गणेश मंडळ, मूर्तिकार, मंडप डेकोरेशन व्यापारी, बँड पथक, डीजे व्यावसायिक या सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे सर्व प्रश्न ऐकून घेण्यात आले. त्यानंतर या सर्वांना प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. वणी हा शांतताप्रिय तालुका असून येथे सर्व जातीधर्माचे लोक एकोप्याने नांदतात. त्यामुळे आगामी सण उत्सवही सर्वांनी एकोप्याने साजरे करावे हा संदेश शांतता समितीच्या या बैठकीतून देण्यात आला. यावर्षी शांतता समितीच्या बैठकीला सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या सभेत महावितरणच्या अभियंत्यांवर सर्व प्रथम रोष व्यक्त करण्यात आला. अकारण वीज पुरवठा खंडित होणे, दिवसातून कित्येकदा विजेचं जाणं येणं सुरु असणे, तासातासाला वीज पुरवठा खंडीत होणे, रात्री अपरात्रीही लाईन जाणे तसेच विजेचा सातत्याने सुरु असलेला लपंडाव ही नेहमीची समस्या बनली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महावितरण वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याचे कुठलेच प्रयत्न करतांना दिसत नाही. महावितणच्या अधिकाऱ्यांवर कुणाचंच नियंत्रण उरल्याचं दिसत नाही. महावितरणचा मनमर्जी कारभार सुरु आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया शांतता समितीच्या सदस्यांमधून उमटल्या. सण उत्सवाच्या काळातही महावितरण वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेतांना दिसत नाही. तेंव्हा यापुढे अकारण वीज पुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना यावेळी महावितरणच्या अभियंत्यांना देण्यात आल्या.
वाहतूक व्यवस्थेवरही शांतता समितीच्या सदस्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. ऑटो चालकांचा बेबंदपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील रस्त्यांवर ऑटो चालकांची मनमानी पाहायला मिळते. शहरातील रस्त्यांवर ऑटो चालक अक्षरशः गोंधळ घालतांना दिसतात. निष्काळजीपणे भरधाव ऑटो चालविणे, नियमांचे सर्रास उल्लंघन करणे, ऑटोत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, कुठेही कसाही ऑटो वाळविणे, भर रस्त्यावर ऑटो उभे करणे हे आता नेहमीचेच झाले आहे. वणी शहरासह तालुक्यात ऑटोची संख्या प्रचंड वाढली आहे. रस्त्यांवर नुसती ऑटोची सर्कस सुरु असते. ऑटो चालकांना नियमांतून सूट दिली की काय असे वाटायला लागले आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया शांतता समितीच्या सदस्यांमधून व्यक्त करण्यात आल्या. तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट बसण्याची आता फॅशनच झाल्याचे दिसत आहे. पोलिस स्टेशन पर्यंत दुचाकीस्वार ट्रिपल सीट बसून येतात. अल्पवयीन मुलंही धूम मोटारसायकल चालवितात.
मुद्दत संपलेल्या मोटारसायकल वेगवेगळे आकार व रूप देऊन सर्रास चालविल्या जात आहेत. वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर बनली असून याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. दीपक चौपाटी परिसरात आठवडी बाजार भरतो. येथे मोबाईल व खिशातील पैसे चोरीला जाण्याच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. आठवडी बाजारात चोरट्यांचा वावर दिसून येतो. त्यामुळे याठिकाणी पोलिस तैनात करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
शहरातील अंतर्गत रस्त्यांमध्ये बराच सुधार झाला आहे. परंतु काही भागातील रस्ते अजूनही जैसे थेच आहेत. गणेश उत्सवात हे रस्ते अडथळे निर्माण करू शकतात. या रस्त्यांनी वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांचीही दुरुस्ती करण्याच्या सूचना यावेळी सदस्यांकडून देण्यात आल्या.
एवढेच नाही तर न्यायाधीशांच्या निवासस्थाकडून प्रशासकीय कार्यालयांकडे येणाऱ्या सिमेंट रस्त्यावरच तळे साचत असल्याच्या अनेक दिवसांपासूनच्या तक्रारी आहेत. प्रशासकीय कार्यालयांकडे येणारा हा शॉर्टकट रस्ता असल्याने हा रस्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. मात्र सिमेंट रस्त्यावरच तळे साचून राहत असल्याने वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. दुकान गाळे धारकांनाही दुकानासमोर तळे साचत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकीय कार्यालयापासून काही अंतरावरच विकासाला खुणावणारा हा रस्ता असतांना व या रस्त्याची झालेली दुर्दशा दृष्टीस पडत असतांना देखील कोट्यवधींच्या निधीतून हा रस्ता मात्र दुरुस्त करण्यात आला नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर पावसाळ्यात तळे साचते. मात्र रस्त्याची दुरुस्ती न करता दुभाजकावर आकर्षक असे स्टीलचे कठडे लावण्यात आले. त्यामुळे निधी कुठे खर्च केला जातो हे यावरून दिसून येते. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी देखील दिवसातून कित्येक वेळा या रस्त्याने जाणे येणे करतात. मात्र दिव्याखालचा हा अंधार त्यांना दिसू नये, याचेच नवल वाटते.
टिळक चौक हा राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण बनला आहे. राजकीय पक्षांचे कोणतेही कार्यक्रम या चौकात घेतले जातात. टिळक चौकाला कार्यक्रम स्थळ बनविण्यात आले आहे. या कार्यक्रमांना पोलिस विभागाकडूनही परवानगी दिली जाते. शहराचे हृदयस्थळ असलेल्या टिळक चौकात राजकीय कार्यक्रम घेऊन वाहतूक व्यवस्था विस्कळीत केली जाते. रत्यावर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे येथे कार्यक्रम आयोजित करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात येऊ नये. अन्यथा न्यायालयात हे प्रकरण न्यावे लागेल, अशाही खणखणीत सूचना सदस्यांमधून देण्यात आल्या. तसेच अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार शहरात वास्तव्य करीत आहेत. ते शहरात उजागिरीने फिरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. गांजा व सुगंधित तंबाखूची तस्करी करणारेही शहरात बिनधास्त वावरत आहेत. ज्यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा गुन्हेगारांचा तडीपारीचा आदेश लवकरात लवकर काढून त्यांना तडीपार करण्याचे देखील यावेळी सुचविण्यात आले. अशा लक्षवेधी सूचनांनी शांतता समितीची ही सभा गाजली. पोलिस प्रशासन व सर्व शासकीय, प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शांतता समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या महत्वपूर्ण सूचनांची दखल घेण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. या सभेला शांतता समितीचे सर्व सदस्य, पत्रकार व सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment