शासकीय नोकरी, बक्कळ पगार, पण दारूच्या व्यसनाने युवक जाऊ लागले काळाच्या पडद्याआड


प्रशांत चंदनखेडे वणी 

युवकांमध्ये वाढलेलं दारूचं व्यसन त्यांना मरणाच्या दाराकडे लोटू लागलं आहे. दारूच्या अगदीच आहारी गेलेले युवक जीवनाला मुकू लागले आहेत. दारू हा आता शौक राहिला नाही तर अनेकांची गरज झाली आहे. दररोज दारूचे सेवन करणारे युवक स्वतःहून मृत्यूचा दरवाजा ठोठावू लागले आहेत. अति मद्य सेवनामुळे युवकांवर अकाली मृत्यू ओढावू लागले आहेत. दारूच्या या व्यसनामुळे कित्येकांचे संसार उघड्यावरच आले नाही तर उद्धवस्त देखील झाले आहेत. व्यसनाधीनतेकडे वळलेले युवक संवेदनाहीन झाले असून त्यांना स्वतःची व कुटुंबाची जराही पर्वा राहिलेली नाही. दारूच्या व्यसनापायी ते स्वतःचं व स्वतःच्या संसाराचं वाटोळं करू लागले आहेत. दारूच्या अगदीच आहारी गेलेल्या युवकांवर अकाली मृत्यू ओढावण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अंगमेहनत करणारा व विशिष्ट क्षेत्रात काम करणाराच युवक दारूच्या आहारी गेला नसून शासकीय नोकऱ्यांमध्ये असणारे युवकही प्रचंड दारूचे व्यसनी झाले आहेत. शासकीय सेवेत असलेले युवक दररोज दारूच्या गुत्थ्यावर बसलेले पाहायला मिळतात. रात्री बियरबारमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या मैफिली रंगतात. पगारदार वर्गाचा दारूचा शौकही शिगेला पोहचला आहे. दारूच्या नशेत झिंगाट होणारे खरंच पिढ्या घडवतील काय, ही खरी शोकांतिका आहे. अनेक तरुण वडिलांच्या जागेवर शासकीय नोकरीत लागले आहेत. त्यामुळे त्यांचा स्वतःवर संयम राहिलेला नाही. त्यांचे तेवर तर सातव्या आसमानावर गेलेच आहेत, पण त्यांच्या शौकांनाही पारावार उरला नाही. रेल्वे विभागात वडिलांच्या जागेवर लागलेल्या युवकांमध्ये दारूचे व्यसन प्रचंड वाढले असून अति मद्यसेवनाने विविध आजारांना बळी पडून मागील काही दिवसांत अनेक युवक जीवाला मुकले आहेत. काही युवकांचे संसार अर्ध्यावर मोडले तर काही कुटुंबाचे आधार हिरावले गेले आहेत. अति मद्य सेवनाने विविध आजारांना बळी पडून एका पाठोपाठ होत असलेली युवकांची एक्झिट कुटुंबावर आघात करणारी ठरू लागली आहे.

काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक जी.आर. काढण्यात आला. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना रेल्वेत नोकरी देण्याचा अभिनव उपक्रम काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडून राबविण्यात आला. ही योजना म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरीची एक सुवर्ण संधी होती. त्यावेळी अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत आपल्या मुलांना नोकरी दिली. आपल्यानंतर आपला मुलगाही रेल्वेत नोकरीवर लागेल, हा आनंद त्यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या गगनात मावेनासा झाला होता. पण वडिलोपार्जित मिळालेली नोकरी अनेकांच्या पचनी पडली नाही. रेल्वेत रुजू झाल्यानंतर तरुणांना महिन्याकाठी बक्कळ पगार मिळू लागला. त्यामुळे काही तरुणांचे शौकही प्रचंड वाढले. वडिलांच्या जागेवर मिळालेली नोकरी व मिळणारा भरमसाठ पगार तरुणांच्या शौकात भर घालणारा ठरला. त्यामुळे रेल्वे विभागात लागलेले काही युवक सैराट झाले. काही जण प्रचंड दारूच्या आहारी गेले. तर काहींना नव्हते ते शौक जडले. यात वडिलांच्या निधनानंतर नोकरीवर लागलेल्या युवकांचाही समावेश आहे.

रेल्वे विभागात नोकरीवर लागल्यानंतर काही तरुण दारूच्या प्रचंड आहारी गेले. दारू पिण्यातच त्यांचा अर्धाधिक पगार खर्ची होऊ लागला. कालांतराने त्यांना विविध आजार जडले. काहींचे शारीरिक अवयव निकामी झाले. त्यामुळे एका पाठोपाठ त्यांचा शेवटचा प्रवास सुरु झाला. काही युवकांनी मरणाचे गाव गाठले. तर काही वाटेवर आहेत. नुकताच एका युवकाचा अति मद्य सेवनामुळे झालेल्या आजाराने मृत्यू झाला. एकाच महिन्यात दारूच्या आहारी गेलेले दोन युवक मृत्युमुखी पडले. काही दिवसांपूर्वीही तरुण रेल्वे कर्मचाऱ्यांचा दारूच्या व्यसनाने बळी घेतला. तसेच अति दारू सेवनामुळे आजारग्रस्त असलेल्या काही युवकांवर सातत्याने उपचार सुरु आहेत. काही युवकांचे शारीरिक अवयव निकामी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना शेवटच्या सूचनाही दिल्या आहेत. दारूच्या अति व्यसनाने युवकांचे नाहक बळी जाऊ लागले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या संसारिक जिवनाची राख रोंगोळी झाली आहे. मुलांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले तर वृद्ध आई वडिलांचे आधार हिरावले गेले आहेत. विवाहित महिलांच्या नशिबी तारुण्यातच वैधत्व आलं आहे. रेल्वेत लागलेल्या काही युवकांचे तर नुकतेच लग्न झाले होते. संसारिक जीवनाची स्वप्ने रंगविण्याच्या काळात हे युवक जीवनाचा डाव अर्ध्यावर सोडून गेले. दारूच्या व्यसनाने होत असलेला घात व जात असलेले जीव उघड्या डोळ्याने दिसत असतांनाही युवक दारू सोडायला तयार नाहीत. ते कुटुंबियांचंही ऐकण्यापलीकडे गेले आहेत. त्यामुळे शासकीय नोकरी असतांनाही या युवकांना भरभरून जगता आलं नाही. कुटुंबंही त्यांच्या व्यसनामुळे नेहमीच चिंतेत राहिलं. शासकीय नोकरी, बक्कळ पगार, पण दारूच्या व्यसनाने युवक जाऊ लागले काळाच्या पडद्याआड.  


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी