कोलकाता व बदलापूर घटनेचा झरी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने जाहीर निषेध, तहसील कार्यालयासमोर करण्यात आले निषेध आंदोलन
प्रशांत चंदनखेडे वणी
कोलकाता व बदलापूर येथील अमानुष घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळी असून या घटनेचा देशवासीयांमधून तीव्र निषेध केला जात आहे. चिमुकल्या मुलींवर व प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर वासनेने पिसाळलेल्या हैवानांकडून अत्याचार करण्यात आला. तसेच महिला डॉक्टरची अत्याचारानंतर निर्दयीपणे हत्या करण्यात आली. हे दोनही खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चाललून नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होऊ लागली आहे. झरी येथेही या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. झरी शिवसेनेच्या वतीने (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात झरी तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. कोलकाता व बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदविण्याकरिता झरी शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या दोनही घटना मानवतेला कलंक फासणाऱ्या असून महिलांच्या सुरक्षेप्रती सजग नसलेल्या सरकार विरोधात यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार नारेबाजी करण्यात आली.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मधिल प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर ९ ऑगस्टला रात्री अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जनप्रक्षोभ उसळला. या घटनेच्या निषेधार्थ देशातील जनता रस्त्यावर उतरली. क्रूरकर्म्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी देशातील प्रत्येक वर्गाकडून करण्यात येत आहे. महिला डॉक्टरवरील अत्याचार व खुनाच्या घटनेनंतर संपूर्ण देशात जनभावना उफाळून आल्या. महिलांच्या सुरक्षेवरून सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेची शाई वळत नाही तोच बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर शाळेतीलच एका नराधम सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. संपूर्ण देशात या दोनही घटनांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेवरून नागरिकांनी सरकारला घेरले आहे. हे दोनही खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे शहरातील व गावातील शासकीय व खाजगी रुग्णालय तथा शाळा महाविद्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून विद्यार्थिनी, शिक्षिका व महिला डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, महिलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रसाधनगृहांची व विश्रामगृहांची व्यवस्था करण्यात यावी, रात्रकालीन नोकरी करणाऱ्या महिला व डॉक्टर परिचारिकांना विशेष सुरक्षा पुरविण्यात यावी, तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी महिलांची शहर व गावपातळीवर समिती गठीत करून यावरील सर्व खर्च सरकारने उचलावा, अशा महत्वपूर्ण मागण्याही यावेळी शिवसेनेकडून (उबाठा) करण्यात आल्या. शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देऊन महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संतोष माहुरे, सतीश आदेवार, गणपत लेडांगे, संतोष मंचलवार, दयाकर गेडाम, बाळू दुधकोहळे, सुरज गड्डमवार, हुशेन्ना कुरेवार, गंभीर भालेराव, अमीर जुनघरे, धनराज निखाडे, नरेंद्र आसुटकर, विजय पानघंटीवार, संजय बीजगुनवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment