मनसेला एकदा संधी द्या, सर्व प्रश्न सोडवू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे
प्रशांत चंदनखेडे वणी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. त्यांनी या दौऱ्यात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्याशी विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. निवडणुकी संदर्भात मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक समर्थपणे लढविणार असल्याचे जाहीर करतांनाच त्यांनी विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे. एवढेच काय तर त्यांनी काही उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहे. चंद्रपूर येथे राज ठाकरे यांच्या आगमनानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सभेत राजुरा विधानसभेकरिता उमेदवारी जाहीर करताच कार्यकर्त्यांचा संयम सुटला. सचिन भोयर यांच्या उमेदवारी वरून प्रकाश बोरकर यांचे समर्थक नाराज झाले, व ते आपापसात भिडले. उमेदवारीवरून भर सभेत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. राज ठाकरे सभा आटपून बाहेर पडताच हा प्रकार घडला. मनसे कार्यकर्त्यांनी सभेत घातलेल्या गदारोळाचा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे.
चंद्रपूर येथील सभा आटपून राज ठाकरे रात्री वणी येथे पोहचले. त्यांनी रात्री हॉटेल जन्नत येथे मुक्काम केला. सकाळी त्यांचं शिवतीर्थ येथे भव्य स्वागत करण्यात आलं. मनसे सैनिकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी शिवतीर्थ येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित करतांना म्हटले की, महाराष्ट्रात खिचडी सरकार आहे. त्यामुळे जनतेचे कुठलेच प्रश्न सुटतांना दिसत नाही. महिला मुलींवरील अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. तेंव्हा मनसेला सत्तेत एकदा संधी द्या, जनतेचे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यानंतर हॉटेल जन्नत येथे संवाद सभा घेण्यात आली. यात सर्व पत्रकारांना आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर त्यांनी नियोजित दौऱ्यानुसार ठरलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रस्थान केले.
Comments
Post a Comment