अवैध दारू विक्री होत असलेला धाबा पेटवून देणाऱ्या ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी घुग्गुस मार्गावरील मंदर गावाजवळ अगदीच मुख्यमहामार्गालगत असलेल्या धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री केली जात होती. त्यामुळे मंदर या गावातील महिलांमध्ये कमालीचा संताप दिसून येत होता. धाब्यावर दारू विक्री न करण्याबाबत धाबा चालकाला वेळोवेळी सांगण्यात आले. मात्र धाबा चालक कुणालाही जुमानत नव्हता. शेवटी महिलांचा संयम सुटला. गावातील ४० ते ५० महिलांनी एकत्र येत धाब्यावर हल्लाबोल केला. महिला एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी धाबाच पेटवून दिला. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. धाबा चालकाने धाबा पेटविणाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदविल्याने पोलिसांकडून सात ते आठ गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदर गावाजवळ मुख्य महामार्गालगत "बब्बू भैय्या का धाबा" या नावाने धाबा सुरु करण्यात आला. या धाब्यावर राजरोसपणे दारू विक्री केली जात होती. त्यामुळे गावातील लहानसहान मुलंही दारूच्या आहारी जाऊ लागले होते. गावात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. धाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याच्या वारंवार तक्रारी करूनही दारू विक्रीवर निर्बंध लावण्यात न आल्याने गावकरी कमालीचे त्रस्त झाले होते. गावालगतच दारू मिळत असल्याने गावकऱ्यांना दारूची चांगलीच लत लागली. मजुरवर्ग मजुरी बुडवून दारूच्या नशेत तर्रर्र होऊ लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी धाब्यावरच हल्लाबोल करून धाबा चालकाला चांगलेच बदडले. त्याला चोप देऊन महिलांनी धाबाच पेटवून दिला. धाब्याला आग लावण्यात आल्याने धाबा पूर्णपणे पेटला. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. धाबा पेटविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याकरिता दबाव वाढू लागला. अशातच धाबा चालक दिलीप सुरजप्रकाश ओझा (३२) रा. कोंडावार ले-आऊट यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आठ ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये निलेश सातपुते, गोलू दुरूतकर, अश्विनी आत्राम, गजानन परसुटकर, भोला लोणारे, प्रमोद बोथले, कपिल आत्राम व एक अनोळखी इसम अशा आठ जणांचा समावेश आहे. त्याच्यावर बीएनएसच्या कलम 189(2), 191(1), 191(2), 191(3), 119(1), 326(f), 115(2), 324(4), 324(5), 351(2), 352 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री होत असतांना त्यावर प्रतिबंध लावण्यात न आल्याने महिलांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा मतप्रवाह दिसून येत आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही न करता आंदोलनकर्त्या ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Comments
Post a Comment