छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला धक्का लावाल तर खबरदार, युवासेनेकडून उमटल्या तीव्र प्रतिक्रिया

प्रशांत चंदनखेडे वणी 

बहुजनांचे आराध्य दैवत व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याने देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पुतळे उभारतांनाही जबाबदारीची जाणीव ठेवली जात नसल्याने देशवासीयांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. बहुजनांची अस्मिता दुखावणाऱ्या या घटनेच्या शहरातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून युवासेनेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा होणारा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा उभारण्याचं कंत्राट देणाऱ्यांपासून तर पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदारापर्यंत सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर विद्यमान सरकारच्या काळात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा २५ ऑगस्टला कोसळला. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं. शिवाजी महाराजांचा हा ३५ फूट उंच पुतळा नुसत्या वाऱ्याने कोसळला. पुतळा उभारताना निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरण्यात आल्याचा आरोप होत असतांनाच पुतळ्यांच्या उभारणीत तरी प्रामाणिकपणा जपावा अशा संतप्त प्रतिक्रिया देशवासियांमधून उमटू लागल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांना मानणारा बहुजन समाज महाराजांच्या अस्मितेला धक्का लागेल असे कोणतेच कृत्य खपवून घेणार नाही. विद्यमान सरकारच्या काळात महाराजांबद्दल वारंवार खेदजनक वक्तव्य करण्यात आलं. महाराजांचा अवमान होईल असा वाक्यप्रचार करण्यात आला. त्यामुळे हे सरकार महापुरुषांच्या विचारांची विटंबना करीत असल्याच्या भावना निर्माण झाल्या आहेत. आता तर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा मोठा अवमान झाला आहे. एक वर्ष पूर्ण होत नाही तोच शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळला. यावरून पुतळा उभारण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळल्याने बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे संबंधित सर्वांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला घेऊन युवासेनेकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहे. दोषींवर जलद कार्यवाही करण्याकरिता युवासेना आक्रमक झाली असून तसे उपविभागीय अधिकारी यांना युवासेनेकडून निवेदनही देण्यात आले आहे. 

युवासेनेचे यवतमाळ जिल्हा समन्वयक समीर लेनगुळे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या या निवेदनावर प्रशांत बलकी, धीरज ढेंगळे, आकाश आसुटकर, मंगेश भोयर, हरिदास केळझरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतांना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी