बंद रेल्वे फाटकाखालून काढल्या जातात मोटारसायकल, अनं.. रेल्वे कर्मचारी बनले मुकदर्शक
प्रशांत चंदनखेडे वणी
रेल्वे फाटक बंद असतांना नागरिकांनी रेल्वे रूळ ओलांडू नये अशा रेल्वे विभागाकडून सूचना प्रसारित करण्यात येत असतांना देखील रेल्वे फाटकाखालून मोटारसायकल व सायकल काढणाऱ्या महाभागांच्या डोक्यात प्रकाश पडल्याचे दिसत नाही. रेल्वे विभागाकडून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. पण नियम मोडणाऱ्यांची संख्या मात्र रोडावल्याचे दिसत नाही. रेल्वेच्या बंद फाटकाखालून मोटारसायकल व सायकल काढणे आता नित्याचेच झाले आहे. वेळप्रसंगी रेल्वे फाटक हाताने उचलून दुचाकी पार करणारे महाभाग दररोज दृष्टीस पडतात. अशा नियम मोडणाऱ्या लोकांवर आधी कार्यवाही व्हायची, त्यांच्या मोटारसायकल जप्त व्हायच्या. मात्र आता कुठलीच कार्यवाही होत नसल्याने रेल्वे फाटकाखालून दुचाकी काढणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेच्या धडकेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले असतांना देखील नागरिक बेजाबदारपणा बाळगत आहेत. वणी वरोरा मार्गावरील रेल्वे फाटकाखालून मोटारसायकल व सायकल काढणाऱ्यांचे वाढलेले प्रमाण चिंतेची बाब बनली आहे. याकडे रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी वरोरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग वरून रेल्वे जाण्याच्या वेळेला फाटक बंद असतांनाही रेल्वे फाटक पार करणे काही दुचाकीस्वारांसाठी नित्याचेच झाले आहे. रेल्वेच्या बंद फाटकाखालून बिनधास्त मोटारसायकल व सायकल काढल्या जातात. आश्चर्याची बाब म्हणजे रेल्वे अगदी जवळ येतांना पाहून दुचाकी धारकांकडून हा स्टंट केला जातो. बंद रेल्वे फाटकातून मोटारसायकल काढल्या जात असतांना रेल्वे कर्मचारी मात्र मुकदर्शक बनून असतात. एवढेच नाही तर रेल्वे फाटक हाताने उचलले जाते. तरीही या महाभागांवर कुठलीच कार्यवाही होतांना दिसत नाही. त्यामुळे बंद फाटकाखालून दुचाकी काढणाऱ्यांच्या हिंमती वाढल्या आहेत. हा प्रकार जीवावर बितु शकतो याची कल्पना असतांना देखील दुचाकी धारक जोखीम पत्करतांना दिसतात. रेल्वे विभागाकडून करण्यात येणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत नियम मोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांवर पूर्वी व्हायची तशी कार्यवाही होणे गरजेचे झाले आहे.
रेल्वे गाडी रेल्वे क्रॉसिंग वरून जाण्याच्या ५ मिनिटं आगोदर रेल्वे फाटक बंद करण्यात येते. परंतु पाच मिनिटेही वाट बघण्याचे सौजन्य मोटारसायकल धारकांकडून दाखविले जात नाही. थोडाही धीर नसलेले दुचाकी धारक बंद फाटकातून दुचाकी काढून रूळ पार करण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा महाभागांवर कार्यवाही होणे व त्यांची दुचाकी जप्त करणे गरजेचे झाले आहे. बंद रेल्वे फाटकातून दुचाकी काढून पुढे मार्ग काढण्याचा प्रयत्न अनेक युवक करतात. अशा नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर रेल्वे विभागाकडून कार्यवाहीचा बडगा उगारला जातो. मात्र तालुक्यात अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही करण्यात आल्याचे दिसत नाही.
Comments
Post a Comment